लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करतानाच, सर्वसामान्यांचे हाल होऊ नयेत यासाठी मदत देण्याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यानुसार दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, या घोषणेला १५ दिवस उलटले तरी अद्याप सर्वसामान्यांच्या पदरात मोफत धान्य पडलेच नसल्याची माहिती समोर आली आहे.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने १६ एप्रिल रोजी मोफत धान्य पुरवठ्याबाबत अधिकृत आदेश जारी केले. त्यानुसार दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना सवलतीच्या शिध्याबरोबरच शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे मोफत धान्य वाटप करण्यासाठी व्यवस्था उभारण्याची सूचना करण्यात आली होती. परंतु, मुंबईतील बहुतांश रास्त दुकानांत मोफत वितरित करण्यासाठी धान्यपुरवठा झालेला नाही, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विद्या विलास यांनी दिली.
शासन निर्णयाला १५ दिवस उलटले तरी मोफत धान्य न मिळाल्याने हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. लॉकडाऊनमुळे रोजी गेल्याने रोटीचा बंदोबस्त कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे.
...........
एकूण रेशनकार्ड धारक ३२,९७,६२१
बीपीएल – २३,७२९
अंत्योदय – २०,६१४
केशरी – ३२,५३,२१४
............
धान्य वितरणाचे पूर्ण नियोजन झाले आहे. पुरवठादारांपर्यंत धान्य पोहोचवण्यासाठी बुधवारी गाड्या रवाना होतील. १ मेपासून मोफत धान्यवाटपास सुरुवात केली जाईल.
-प्रशांत काळे, उपनियंत्रक, पुरवठा विभाग
.............
मोफत धान्य काय मिळणार
तांदूळ २ किलो
गहू ३ किलो
..........
लॉकडाऊनच्या काळात गरिबांना एक महिना मोफत धान्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. पण त्यांनी जाहीर केलेली मदत आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. धान्य द्यायचे नव्हते तर नुसती पोकळ घोषणा का केली?
-वर्षा पाटील, चांदीवली
......
एक महिना मोफत धान्य मिळणार असल्याने लॉकडाऊनमध्ये कसातरी घरगाडा सुरू ठेवायचा याचे नियोजन केले होते. परंतु, धान्याचा एकही दाणा मिळाला नाही. रोजगार बंद असल्याने खायचे काय याची चिंता भेडसावू लागली आहे.
-भारत वास्कर, मालाड
.............
टीव्हीवर दाखवतात गरिबांना मोफत धान्य मिळणार आणि रेशन दुकानदार सांगतो अजून आमच्यापर्यंत काही आलेले नाही. यांच्या टोलवाटोलवीने गरिबांचे पोट भरणार आहे का? धान्य देणार नसाल तर लॉकडाऊन उठवा. आम्ही आमच्या मेहनतीवर कुटुंबाचे पोट भरू.
-दीपाली भोवड, घाटकोपर