चेतन ननावरे / मुंबईमुंबईतील मतदानाचा टक्का वाढावा, म्हणून महानगरपालिका प्रशासनासोबत राज्य व केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. यामध्ये स्वयंसेवी संस्थाही मागे नाहीत. मात्र, परळ गावातील राम टेकडी परिसरातील सलूनमध्ये तरुण मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी अफलातून फंडा वापरण्यात आला. अमेरिकेहून आलेल्या तीन तरुण हेअरस्टायलिस्टनी मोफत कटिंग करत, तरुणांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.विन्सेन जोसेफ, मॅनी, मार्क गुस्टोस अशी त्या तीन तरुण हेअरस्टायलिस्टची नावे आहेत. राम टेकडीवरील एका सलूूनचा ताबाच या तिघांनी घेतला होता. यांच्यामधील विन्सेन जोसेफ म्हणजे व्हीजे याने सांगितले की, ‘तरुणांना मनोरंजन खूप आवडते. म्हणून मनोरंजनाच्या माध्यमातून मतदान जनजागृती करत आहे. यासाठी येथील सलून मालकाकडे केस कापण्याची परवानगी मागितली. त्यानेही हसत-हसत परवानगी दिल्याने, तरुणांचे केस कापून त्यांना मतदानासाठी आवाहन करत आहे. अधिकाधिक तरुणांनी आपले कर्तव्य पार पाडावे, यासाठी हा एक उपक्रम म्हणून आम्ही मोफत काम करत आहोत.’ दरम्यान, अंगभर टॅटू काढलेल्या या परदेशी हेअरस्टायलिस्टने सर्वच मतदारांचे लक्ष वेधून घेतले. मोफत कटिंग होत असल्याने नागरिकांनीही या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्यात तिघेही हेअरस्टायलिस्ट आपल्या कला दाखवून तरुणांना आकर्षित करून घेत होते. दुपारी १२ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत या तीनही तरुणांनी मोफत हेअर कटिंग करत, तरुणांना मतदान करण्याचे आवाहन केले.
जनजागृतीसाठी मोफत हेअर कटिंग!
By admin | Published: February 22, 2017 7:31 AM