Join us  

जेष्ठांची वर्षातून दोनदा मोफत आरोग्य तपासणी करणार, शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यलयाला सूचना

By संतोष आंधळे | Published: February 16, 2024 9:53 PM

या जेष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी आठवड्यातील दोन स्वतंत्र दिवस असणार आहेत.

मुंबई : राज्यात १ कोटी ५० लाखापेक्षा अधिक जेष्ठ नागरिक असून त्याच्यासाठी विशेष करून आरोग्याच्या सुविधा असाव्यात. याकरिता अनेकवेळा प्रशासकीय पातळीवर चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णलयात या जेष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळ मोफत तपासणी करावी. तसेच त्यांना काही आजार आढळून आल्यास त्यांना महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार द्यावे असे आदेश विभागाने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना दिले आहेत. दरम्यान, या जेष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी आठवड्यातील दोन स्वतंत्र दिवस असणार आहेत.

काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री  एकनाथ जेष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये त्याच्या आरोग्यच्या सुविधा ही मुख्य मागणी होती. त्यामध्ये जेष्ठ नागरिकांना आरोग्यच्या सुविधा कशा सहज पद्धतीने देता येतील यावर आरोग्य विभागातील अधिकाऱ्याशी चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार त्यांच्या साठी स्वतंत्र बाह्य रुग्ण विभाग आणि स्वतंत्र दोन दिवस असावेत असे ठरविण्यात आले होते. तसेच वर्षातून दोनदा जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याची मोफत चाचणी करण्याच निर्णयात घेण्यात आला होता. त्यानुसारत त्या संदर्भातील आदेश राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला देण्यात आले होते. कारण वैद्यकीय विभागाच्या महाविद्यालयाशी संलग्न रुग्णलायत आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध  असतात. वैद्यकीय शिक्षण विभागाची राज्यात २५ वैद्यकीय महाविद्यालये असून चार दंत महाविद्यालये आहेत. या सर्व महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात आता यापुढे जेष्ठ नागरिकांसाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात येणार आहे. तसेच त्या आरोग्य तपासणीची नोंद आभा कार्ड आणि एच एम आय एस प्रणाली मध्ये केली जाणार आहे. तसेच या वैद्यकीय चाचणीत काही आजरा आढळून आल्यास त्यावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अटी व शर्ती नुसार उपचार करण्यात येणार आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांनी सदर योजनेची माहिती फलक रुग्णालयाच्या परिसरातील प्रथम दर्शनी भागात लावण्यात येणार आहे.    

राज्यातील काही वैद्यकीय महाविद्यलयात जिऱ्याट्रिक ( जेष्ठ नागरिकांचे उपचार ) पदव्युतर अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. त्या ठिकणी जेष्ठ नागरिकांच्या उपचारासाठी स्वतंत्र विभाग सुरु करण्यात आला आहे. जे जे रुग्णालयात जेष्ठ नागरिकांच्या उपचाराकरिता विशेष वॉर्ड् तयार करण्यात आला आहे. त्या ठिकाणी त्यांना उपचार देण्यात येतात. या अशा पद्धतीचा अभ्यासक्रम राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयात सुरु करण्यासाठी विभागातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.

गेल्या काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनुसार हा निर्णय घेणयात आला आहे. या निर्णयाच्या सर्व सूचना राज्यातील सर्व अधिष्ठातांना देण्यात येणार आहे. तसेच या निर्णयांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच ओ पी डी मध्ये आठवड्यातील स्वतंत्र दोन दिवस ठेवण्यात येणार आहे.    

राजीव निवतकर, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण विभाग 

टॅग्स :आरोग्यहॉस्पिटल