मुंबई : मुंबईतील खड्डे कोल्डमिक्स मिश्रणाने भरण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. मात्र, पावसाळ्यात मुंबईतील बहुतांशी रस्ते खड्ड्यात जातात. या रस्त्यांची माहिती वेळेत पोहोचून ते तत्काळ दुरुस्त करता यावे, यासाठी महापालिकेने या वेळेस स्वतंत्र हेल्पलाइन सुरू केली आहे. २४ विभाग कार्यालयांतील व्हॉट्सअॅप नंबरबरोबरच या क्रमांकावर नागरिकांना आपल्या विभागातील खड्ड्यांची तक्रार करता येणार आहे.मुंबईतील रस्ते दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांत जातात. मुसळधार पावसात तर रस्त्यांची चाळणच होते. मोठे खड्डे तत्काळ भरण्यात येत असले तरी अनेक छोट्या रस्त्यांवरील खड्ड्यांची नोंदही होत नाही. यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. काही वर्षांपूर्वी महापालिकेने एका संकेतस्थळाद्वारे खड्ड्यांच्या तक्रारी घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, या संकेतस्थळाचे कंत्राट संपल्यानंतर खड्ड्यांच्या तक्रारी कुठे करायच्या? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता.खड्ड्यांच्या तक्रारींसाठी महापालिकेने २४ विभाग कार्यालयांतील व्हॉट्सअॅप नंबर उपलब्ध करून दिले आहेत. त्याबरोबरच महापालिकेने तक्रारी नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे. जे मुंबईकर व्हॉट्सअॅप वापरत नाहीत, अशा मुंबईकरांना महापालिकेच्या या १८००२२१२९३ टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविता येणार आहे. ‘एमसीजीएम’ हे मोबाइल अॅपही पालिकेने उपलब्ध करून दिले आहे.
खड्ड्यांच्या तक्रारींसाठी आता स्वतंत्र हेल्पलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 2:02 AM