कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी विनामूल्य रुग्णालय ते घरपोच रिक्षा सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:07 AM2021-04-30T04:07:24+5:302021-04-30T04:07:24+5:30
मुंबई : गेल्या काही दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र अशा परिस्थितीमध्येही काही जण समाजाच्या सेवेसाठी पुढे येत आहेत. ...
मुंबई : गेल्या काही दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र अशा परिस्थितीमध्येही काही जण समाजाच्या सेवेसाठी पुढे येत आहेत. व्यवसायाने शिक्षक असलेले दत्तात्रय सावंत हे कोरोनाच्या महामारीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी विनामूल्य रुग्णालय ते घरपोच अशी रिक्षासेवा देत आहे.
रिक्षाचालक दत्तात्रय सावंत हे घाटकोपरमध्ये राहतात. ज्ञानसागर विद्यामंदिर शाळेत ते इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत. मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत दत्तात्रय सावंत हे मागील काही दिवसांपासून ईशान्य मुंबईत कोरोना रुग्ण असलेल्या व्यक्तींना व त्यांच्या नातेवाइकांना विनामूल्य घर ते रुग्णालय व रुग्णालय ते घर अशी रिक्षासेवा देत आहेत. सावंत यांच्या या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. आज घाटकोपरमधील हिंदुसभा रुग्णालयातून कोरोनामुक्त रुग्णाला त्यांनी घरपोच सेवा दिली. यावेळी हिंदुसभा रुग्णालयातील परिचारिका, डॉक्टर यांच्यातर्फे टाळ्या वाजवत रुग्ण आणि रिक्षाचालक यांचे कौतुक करण्यात आले. ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी सावंत यांना सेवाकार्यालयात बोलावून त्यांना शुभेच्छा देत प्रवासात लागणाऱ्या साधन सामग्रीची मदत केली, तर नगरसेवक सूर्यकांत गवळी यांनी रिक्षाचालकास सुरक्षा म्हणून पीपीटी किट व सॅनिटायझर पंप भेट दिला. कोरोनाच्या या महामारीत रिक्षाचालक दत्तात्रय सावंत यांनी आता पर्यंत २६ कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मोफत प्रवास दिला असल्याचे रिक्षाचालक दत्तात्रय सावंत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.