मुंबई : ग्रामीण भागातील महिलांना रेशनिंगवर राज्य सरकारने मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून द्यावेत, या प्रमुख मागणीसह महिलांसाठीच्या विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्त्या छाया काकडे यांनी महिला कार्यकर्त्यांसह फोर्ट येथील आझाद मैदानात गुरुवारपासून बेमुदत उपोषण छेडले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे काकडे यांनी सांगितले.ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकिन सहज उपलब्ध होत नाही. खेड्यापाड्यांत मेडिकल, मार्केट किंवा मॉल्स जवळ नसल्याने सॅनिटरी नॅपकिनसाठी महिलांना घरापासून दूरचा प्रवास करावा लागतो. नॅपकिनच्या किमतीपेक्षा जास्त पैसे प्रवासासाठी खर्च होतात. त्यामुळे शासनाने पुढकार घेत सॅनिटरी नॅपकिन सर्वत्र उपलब्ध करून द्यावे, अशी छाया काकडे यांची मागणी आहे. सरकारने सॅनिटरी नॅपकिन रेशनिंगवर मोफत उपलब्ध करून द्यावे. कर्करुग्ण महिलांना आरोग्याच्या सुविधा मोफत मिळवून द्याव्यात. माध्यमिक शाळा व महाविद्यालयांमध्ये सॅनिटरी व्हेंडिंग मशीन बंधनकारक करावे. त्यांना याबाबत परिपत्रक पाठवून अंमलबजावणीची पाहणी करावी, अशा उपोषणकर्त्यांच्या मागण्या आहेत. आंदोलनामुळे सरकारला जाग येऊन प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला आहे.
मोफत सॅनिटरी नॅपकिनसाठी बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 5:47 AM