लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना काळात भुकेलेल्यांना अन्न मिळावे म्हणून अन्नपूर्णा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून एकीकडे गरीब, गरजू, भुकेलेल्यांना जेवण दिले जात आहे, तर दुसरीकडे काही व्यक्तींना व्यवसाय दिला जात आहे. जीएमबीएफ ग्लोबल केअर्स दुबई ही संस्था अन्नपूर्णा प्रकल्पास आर्थिक मदत करत आहे. या संस्थेचे समन्वयक प्रसाद दातार यांच्या माध्यमातून या संस्थेशी संपर्क साधला जात आहे. राहुल कुलकर्णी हे डबे देणाऱ्या गरीब कुटुंबांतील महिलांना जेवण, स्वच्छता, पॅकिंग व इतर बाबींचे मार्गदर्शन करीत आहेत. अन्नपूर्णा हा प्रकल्प डॉ. मनीषा सोनवणे आणि डॉ. अभिजित सोनवणे चालवित असून एकूण पाचशे लोकांना मोफत जेवण जात आहे.
हा प्रकल्प २९ एप्रिल रोजी सुरू करण्यात आला आहे. किमान २१ डबे गरिबांना दररोज देऊन त्यांची भूक भागवू शकू का, हे आपल्याला जमेल का ? असे प्रश्न २८ एप्रिलपर्यंत सतावत हाेते, असे डॉक्टर फॉर बेगर्सचे डॉ. अभिजित सोनवणे यांनी सांगितले. मात्र, आजच्या नऊ तारखेला आम्ही हा आकडा ५०० इतका गाठला आहे. रोज ५०० लोकांना जेवण देत आहोत. कोणत्याही भल्यामोठ्या कॅटरिंग व्यवसाय करणाऱ्या एखाद्या कंपनीला डब्यांची ऑर्डर देणे, निवांत बसून फक्त देखरेख ठेवणे, सहज शक्य होते; परंतु माझी पत्नी डॉ. मनीषा सोनवणे यांनी या प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारली. या प्रकल्पांतर्गत भुकेलेल्यांना अन्न देतानाच तळागाळातील, ज्यांचे व्यवसाय थांबले आहेत, ज्यांचा रोजगार गेला आहे अशांना पुन्हा रोजगार मिळवून देता आला पाहिजे, असे त्यांना वाटले. त्यामुळे पहिल्या टप्प्यात समाजातील ज्या महिला खानावळ चालवून संसाराचा गाडा एकाकी झुंज देऊन हाकत होत्या. मुलाबाळांचे शिक्षण करत होत्या; परंतु आताच्या या काळात हा व्यवसाय पूर्णपणे थांबला, ज्यांना कुणाचीही विशेष साथ नाही, अशा या महिलांना या प्रकल्पातून मदत करायचे आम्ही ठरवले. काही दिव्यांग व्यक्तींना आधार द्यायचे ठरवले आणि खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झाला. सुरुवातीला १० डबे दररोज (४० रुपये प्रती डबा) घ्यायला सुरुवात केली. आता १० मेपासून यांच्याकडील डब्यांची संख्या वाढवत आहोत. या सर्वांकडून आता दहाऐवजी २० डबे दररोज विकत घेणार आहोत. एकूण हिशेब पाहता प्रत्येकाच्या खात्यावर, महिनाअखेरीस २० हजार रुपये इतकी रक्कम जमा होईल आणि एक कुटुंब सावरायला आता नक्कीच मदत होईल, असे साेनवणे यांनी सांगितले.
* अनेकांनी दिला मदतीचा हात
समाजातील दानशूर मंडळी आणि संस्था आम्हाला तयार डबे आणून देत आहेत. कीर्ती ओसवाल, प्रशांत गुंजाळ, विकास रुणवाल, शेखर काची, संगीता रासकर यांच्या माध्यमातून ओळख झालेल्या आणि समाजाची सेवा घडावी या भावनेने काम करणाऱ्या कोथरूडमधील एका सोसायटीतल्या मोहिनी दिघे आणि ग्रुप आम्हाला डबे पोहोचवत आहेत. याशिवाय जीएमबीएफ, ग्लोबल केअर्स हा दुबईमध्ये असणाऱ्या, समविचारी लाेकांचा एक ग्रुप असून, महाराष्ट्रातल्या मातीचे ऋण फेडण्यासाठी ही सर्व मंडळी तेथून मदतीचा हाता देत आहेत. अशाप्रकारे पुणे आणि चिंचवड परिसरात १८ ठिकाणी जवळपास ४०० हून अधिक लोकांना जेवण दिले जात आहे. राजीव गांधी हॉस्पिटल, येरवडा या हॉस्पिटलबाहेर रुग्णांचे नातेवाईक आणि रस्त्यावरील गरजू लोक अशा १०० लोकांना रात्रीचे जेवण देत आहेत, असे ते म्हणाले.
--------------------------
..................................