लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्सवरील जागेवरील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब मध्ये ५० लोकांना आजीवन मोफत सदस्यत्व देण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असेल. त्याशिवाय दरवर्षी तीन मोफत आजीवन सदस्य नेमण्याचा अधिकारही मुख्यमंत्र्यांना असेल, असा शासन निर्णय काढल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ३०० एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान उभे करण्याची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात रेसकोर्सवरील १२० एकर जागाच यासाठी वापरली जाणार आहे. उरलेली ९१ एकर जागा टर्फ क्लबला दिली जाईल. यावरूनही उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
रेसकोर्सची जागा २११ एकर आहे. त्यापैकी १२० एकर जागेवर सेंट्रल पार्क आणि ९१ एकर जागा टर्फ क्लब साठी असेल. कोस्टल रोडमधून जी १८० एकर ग्रीन स्पेस उपलब्ध होईल ती जागा भराव टाकून सेंट्रल पार्कसाठी वापरली जाईल. म्हणजे सलग ३०० एकर जागेत सेंट्रल पार्कसारखा पार्क होणार नाही.
या क्लबची मेंबरशिप केंद्र राज्य सरकारच्या तसेच मुंबई महापालिकेच्या सेवेतील ‘अ’ वर्ग अधिकाऱ्यांना सर्व्हिस मेंबर म्हणून दिली जाणार आहे. त्याशिवाय संबंधित अधिकारी हे सदस्यत्व मुंबई शहर जिल्ह्यात आस्थापनेवर असताना मोफत वापरू शकतील. नगरविकास विभागाच्या दोन्ही सचिवांना तसेच मुंबई महापालिकेचे आयुक्त यांना या क्लबचे आजीवन मोफत सदस्यत्व दिले जाणार आहे. प्रत्येक वर्षी एक आजीवन मोफत सदस्यत्व नामनिर्देशित करण्याचा अधिकार नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आला आहे.
तर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ज्या ठिकाणी देण्या-घेण्याशिवाय दुसरे काही होत नाही. तिथून वेगळी अपेक्षा काय करणार? अशी प्रतिक्रिया दिली आहे. या आधीच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे स्वेच्छा अधिकार स्वतःहून सोडून दिले होते. हा इतिहास महाराष्ट्राला असताना या सरकारने ५० जणांना फुकट सदस्यत्व देणे अत्यंत चुकीचे आहे.
हा आदेश न्यायालयात टिकणार नाही. रेसकोर्सचे एक ऐतिहासिक महत्त्व जगभरात आहे. त्याच जागी मुंबईकरांसाठी चांगले उद्यान उभे करत असताना अशा पद्धतीने अधिकाऱ्यांना खैरात वाटणे योग्य नाही. सगळे नियम कायदे बाजूला ठेवून या पद्धतीने सदस्यत्व फुकट देण्यामुळे क्लबची स्वायत्तता धोक्यात येणार आहे. - पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री.
मोक्याची जागा विकसित करताना क्लब संस्कृती सरकारने तरी आणू नये. सेंट्रल पार्क आणि तिथे उभारल्या जाणाऱ्या सोयी मुंबईकरांसाठी आहेत की निवडक अधिकाऱ्यांसाठी? क्लब कुठेही करता येईल. रेसकोर्सवर जाणारे लोक हे विशिष्ट वर्गातले आहेत. सर्वसामान्य नागरिक तिथे जात नाहीत. त्यामुळे रेसकोर्सच्या संपूर्ण जागेचा वापर सेंट्रल पार्कसाठी केला तर समजू शकतो. मात्र, त्यातही ९१ एकर जमीन टर्फ क्लबला द्यायची आणि उरलेल्या १२० एकर जागेत सेंट्रल पार्क करायचे हे कितपत योग्य आहे? - विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते.