- मनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई-संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी न्यू दिंडोशीत गोरेगाव (पूर्व) म्हाडाने सुमारे २००५ साली बांधलेले रॉयल हिल्स सहकारी संस्थेत ७७ बंगले आहेत. मात्र येथे मध्यरात्री बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने येथील सुमारे ५०० रहिवासी भयभीत झाले आहे. विशेष म्हणजे भक्ष्य शोधण्यासाठी दि,७ आणि दि,८ मार्चला सलग दोन दिवस बिबट्या मध्यरात्री येथील बंगल्याच्या या गच्चीवरून दुसऱ्या गच्चीवर उड्या मारत मुक्त संचार करत असल्याने आमची रात्रीची झोपच उडाली असल्याची माहिती रॉयल हिल्स सहकारी संस्थेचे अध्यक्ष दीपक दिवटे आणि सचिव अजित जठार यांनी लोकमतला दिली.
वनविभाग आणि इतर संबंधित सरकारी अधिकारी या जीवघेण्या धोकादायक जीवन परिस्थितीकडे लक्ष देत नाहीत.यापूर्वी वनखात्याला तक्रारी व पत्रव्यवहार करून सुद्धा आमच्या बंगलो धारकांच्या सुरक्षिततेकडे वनखात्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.विशेष म्हणजे येथे बिबट्या सोसायटी च्या आवारात फ्लड लाईट्स असून सुद्धा येतो एवढी बिबट्याची डेरिंग असल्याचे जठार म्हणाले.आमच्या सोसायटीच्या मागील बाजूस संरक्षक भिंत बांधून द्यावी अशी मागणी आणि पत्रव्यवहार आम्ही म्हाडाकडे अनेक वेळा केली होती,परंतू आमच्या मागणीला म्हाडाने केराची टोपली दाखवली असा आरोप त्यांनी केला.तात्काळ आमच्या संरक्षणाची व्यवस्था करावी अशी कळकळीची विनंती येथील रहिवाश्यांनी लोकमतच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे.
येथील बिबट्याचा मुक्त संचारा बाबत लोकमतला अधिक माहिती देतांना दीपक दिवटे आणि अजित जठार यांनी सांगितले की, नॅशनल पार्कच्या जंगलात असलेल्या मागील बाजूने बिबट्या वारंवार आमच्या सोसायटीत घुसल्याने रहिवासी भयभीत झाले असून त्यांचा जीव धोक्यात आला आहे. गेल्या ८ ते १० वर्षात अधूनमधून ३ ते ४ वेळा बिबट्या येथे येत होता. मात्र आता गेल्या ६ ते ८ महिन्यांपासून सोसायटीच्या आवारात बिबट्या येण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. गेल्या काही दिवसांत रो-हाऊसच्या गच्चीवर ३ ते ४ वेळा बिबट्याचा शिरकाव झाला आहे. बिबट्याची शेवटची एंट्री दि, ७ मार्च रोजी मध्यरात्री १२.३७ मिनिटांनी येथील बंगलो क्रमांक ४५ डी, ४५ सी, ४५ बी, ४५ ए आणि 44 डी च्या टेरेसवर मध्यरात्री उड्या मारत १२.२७ ते १.२८ पर्यंत सुमारे एका तासापेक्षा जास्त तो टेरेसवर होता.तर दि,८ मार्च रोजी मध्यरात्री २.२८ मिनीटांनी त्यांची हालचाल सोसायटीच्या सीसी टिव्ही कॅमेरात कैद झाली असल्याची माहिती त्यांनी लोकमतला दिली.
याबाबत शिवसेनेचे उद्धव बाळासाहेव ठाकरे गटाचे विधीमंडळ मुख्य प्रतोद आणि दिंडोशी विधानसभा क्षेत्राचे स्थानिक आमदार,माजी महापौर सुनील प्रभू यांच्याशी संपर्क साधला असता,आजच आपण विधानसभेत याबाबत आवाज उठवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आणि विधिमंडळाचे लक्ष वेधून तातडीने येथे उपाययोजना करण्यास सांगतो. तसेच संबंधित वनखात्याच्या अधिकाऱ्यांशी बोलून येथे पिंजरे लावणे,प्रखर फ्लड लाईट्स लावणे,वनखात्याची गस्त वाढवणे,आणि येथे संरक्षक भिंत म्हाडाने करावी या उपाययोजना तात्काळ अमलात आणाव्यात अशी आग्रही मागणी करणार आहे. येथील रहिवाश्यांच्या जीवाचे रक्षण करणे ही शासनाची आणि वनखात्याची जबाबदारी असल्याचे आमदार सुनील प्रभू यांनी ठामपणे सांगितले.