मुंबई शहर गुटखा मुक्त करा; राजेश शर्मा यांची मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी
By मनोहर कुंभेजकर | Published: April 3, 2024 05:16 PM2024-04-03T17:16:06+5:302024-04-03T17:18:19+5:30
मुंबई शहरामध्ये सर्रासपणे गुटखा विक्री होत असून गुटख्याच्या सेवनाने नागरिकांना विविध आजरांशी सामना करावा लागतो.
मनोहर कुंभेजकर, मुंबई :मुंबई शहरामध्ये सर्रासपणे गुटखा विक्री होत असून गुटख्याच्या सेवनाने नागरिकांना विविध आजरांशी सामना करावा लागतो.गुटख्यामुळे तोंडाचा कॅन्सर हाेण्याचा धाेका वाढताे. तसेच अन्ननलिकेचा अल्सर व कॅन्सरही हाेण्याचा धाेका वाढताे. मात्र, तरीही अनेक कंपन्यांचा गुटखा मुंबईच्या विविध भागात विक्री केला जातो.
मुंबईमध्ये गुटखा विक्री बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होते.२०१२ मध्ये गुटख्याला राज्यातून बंदी घातली होती. आता १२ वर्षे उलटली तरीही मुंबईतून गुटखा बंद झालेला नाही. ताे पूर्वी टपऱ्यांवर माळांच्या स्वरूपात असायचा तसा आता दिसत नाही. आता कागदांमध्ये गुंडाळलेला तर कधी पिशव्यांमध्ये टपरीचालक ठेवताना दिसतात.
गुटखा विक्री करणारा आणि खरेदी करणारा या दोघांवर कायदेशीर कारवाई करत मुंबई शहर गुटखा मुक्त करावी अशी मागणी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुंबईचे माजी उपमहापौर राजेश शर्मा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे. मुंबई शहर गुटखा मुक्त करावी अशी मागणी त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.