एमयूटीपी-३ चा मार्ग मोकळा
By admin | Published: February 26, 2016 01:11 AM2016-02-26T01:11:48+5:302016-02-26T01:11:48+5:30
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी असलेल्या एमयूटीपी- ३ प्रकल्पाचीही प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. यामुळे एमयूटीपी-३ चा मार्ग मोकळा झाला आहे.
अखेरच्या मंजुरीसाठी आता कॅबिनेट बैठकीकडे लक्ष
मुंबई : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी असलेल्या एमयूटीपी- ३ प्रकल्पाचीही प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. यामुळे एमयूटीपी-३ चा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पाला अखेरची मंजुरी ही कॅबिनेटच्या बैठकीत मिळणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट केले.
एमयूटीपी-३ प्रकल्पाची गेल्या वर्षी घोषणा करण्यात आली होती. ११ हजार कोटी रुपये किमतीच्या या प्रकल्पात पनवेल-कर्जत मार्गाचे दुहेरीकरण, विरार-डहाणू रोड मार्गावर चौथा मार्ग, ऐरोली-कळवा लिंग रोड, ठाणे-भिवंडी उपनगरीय रेल्वे मार्ग आणि वसई-विरार पनवेल-उपनगरीय मार्गाचा समावेश आहे. मात्र, यातील सुरुवातीला एरोली-कळवा लिंक रोड, विरार-डहाणू मार्गावर चौथा मार्ग आणि पनवेल-कर्जत दुहेरीकरण हे तीन प्रकल्पच पूर्ण करण्यावर भर देण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला. या योजनेसाठीच्या निधीला निती आयोगाकडूनही मंजुरी देण्यात आली. मात्र, कॅबिनेटकडून मंजुरी मिळाली नव्हती. याबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी माहिती देऊन अप्रत्यक्षरीत्या कॅबिनेटमध्येही मंजुरी घेतली जाईल, हेच सूचित केले. काही प्रकल्पांच्या सर्वे आणि अन्य कामांसाठी पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
एमयूटीपी-३ मधील प्रकल्पांचा खर्च
ऐरोली-कळवा लिंक रोड- खर्च ४२८ कोटी रुपये
वसई-विरार-पनवेल उपनगरीय मार्ग - ५,५७३ कोटी
पनवेल-कर्जत मार्गाचे दुपदरीकरण - २,६१८ कोटी
ठाणे-भिवंडी उपनगरीय मार्ग - एक हजार कोटी
विरार-डहाणू रोड मार्गावर चौथा मार्ग - ३,५५५ कोटी