रस्त्यावरील फुकट पार्किंग बंद

By Admin | Published: August 14, 2015 11:45 PM2015-08-14T23:45:57+5:302015-08-14T23:45:57+5:30

ठाणे महापालिकेच्या कागदावर असलेल्या पार्किंग धोरणाला मागील वर्षी मान्यता मिळाली असली तरी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी अद्यापही होऊ शकलेली नाही. विशेष म्हणजे महासभेने

Free parking is available on the road | रस्त्यावरील फुकट पार्किंग बंद

रस्त्यावरील फुकट पार्किंग बंद

googlenewsNext

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कागदावर असलेल्या पार्किंग धोरणाला मागील वर्षी मान्यता मिळाली असली तरी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी अद्यापही होऊ शकलेली नाही. विशेष म्हणजे महासभेने या धोरणानुसार प्रशासनाने आणलेले दर सुधारित करण्यासाठी बैठकही घेतली होती. परंतु, हे सुधारित दर प्रशासनाला प्राप्त न झाल्याने अखेर त्यांनी दरवाढीचा तोच प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास पहिल्या दोन तासांसाठी दुचाकीचालकांना २० तर चारचाकीचालकांना ५० रुपये मोजावे लागणार आहेत. चार श्रेणींत ही पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून ते अमलात आल्यावर रस्त्यांवरील फुकटचे पार्किंग कायमचे बंद होणार आहे.
नऊ प्रभाग समितीअंतर्गत १७७ रस्त्यांवर ही सुविधा उपलब्ध होणार असून या ठिकाणी दुचाकी, तीनचाकी, चारचाकी हलकी आणि अवजड अशी तब्बल ९ हजार ८५५ वाहने पार्क होणार आहेत. या कामासाठी ३९० पार्किंग मार्शल आणि ३४ पार्किंग सुपरवायझर नेमण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे अहोरात्र रस्त्यांच्या कडेला कुठेही कशाही पद्धतीने रिक्षा, चारचाकी आणि कमर्शिअल वाहने पार्क करणाऱ्या वाहनचालकांनाही आता त्यासाठी पार्किंगचा मासिक पास काढावा लागणार आहे. यासाठी वार्षिक ९ कोटी ५९ लाख २२ हजार आणि भांडवली कामासाठी ४ कोटी ७३ लाख ६५ हजारांचा खर्च अपेक्षित धरला आहे. नऊ प्रभाग समितीअंतर्गत हे धोरण राबविणार असून त्यानुसार एकाच वेळी सुमारे ४ हजार दुचाकी आणि २५०० चारचाकी वाहने प्रत्येक तासाला पार्क होऊ शकणार आहेत. मनपाने याचे दरदेखील निश्चित केले होते. परंतु, महासभेने यात बदल केला. मात्र, नवे दर पालिकेकडे वर्ष उलटूनही प्राप्त न झाल्याने त्यांनी पुन्हा तोच दरवाढीचा प्रस्ताव पुढे आणला आहे.
या नव्या धोरणानुसार नऊ प्रभाग समितीअंतर्गत चार टप्प्यांत पार्किंग होणार आहे. यामध्ये ए श्रेणीत-मुख्य रस्ते- व्यावसायिक पार्किंग, बी श्रेणीत- क्रॉस रस्ते, सी श्रेणीत शाळा, हॉस्पिटल आणि डी श्रेणीत- रहिवासी क्षेत्र आदींचा समावेश आहे.

वाहतूक मार्शल करणार फी वसूली
दर निश्चित झाल्यानंतरच पहिल्या टप्प्यात तब्बल २०० वाहतूक मार्शल नेमण्यात येणार आहेत. त्यांच्याकडूनच पार्किंगची फी वसूल केली जाणार आहे. तसेच या वाहतूक मार्शलच्या जोडीलाच दुसऱ्या टप्प्यात पार्किंगच्या ठिकाणी येणाऱ्या वाहनचालकांना त्या ठिकाणी पार्किंगची जागा उपलब्ध आहे अथवा नाही, याची माहिती मोबाइलच्या एका क्लिकवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच पार्किंगच्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक बोर्ड लावण्यात येणार आहेत.

आरक्षित भूखंडावरही होणार पार्किंग
महापालिकेने आता शहरातील आरक्षित भूखंड जोपर्यंत विकसित होत नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार, तात्पुरत्या स्वरूपात पे अ‍ॅण्ड पार्क, बेवारस वाहने जमा करणे आदींसाठी त्याचा वापर केला जाणार आहे.

हे पार्किंग धोरण अमलात येण्यासाठी सुमारे ४ कोटींचा खर्च अपेक्षित धरला असून महिन्याला वाहतूक मार्शल मेंटेनन्स आणि इतर खर्च हा ८० लाखांच्या आसपास धरला आहे. तरी या माध्यमातून महिन्याला १ कोटींच्या आसपास उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे ठामपाला सुमारे २० लाखांचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे.

नऊ प्रभाग समितीअंतर्गत या चारही श्रेणींची वर्गवारी करण्यात आली असून कळवा प्रभाग समितीअंतर्गत १० रस्त्यांवर एकूण ७६४, कोपरीमध्ये २० रस्त्यांवर ६७४, माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत १३ रस्त्यांवर ३७६, मुंब्रा प्रभाग समितीत १९ रस्त्यांवर १३४७, नौपाडा २४ रस्ते असून येथे १८०५, रायलादेवीमध्ये ३४ रस्त्यांवर २०८१, उथळसरमध्ये २६ रस्त्यांवर १२९८, वर्तकनगरमध्ये २६ रस्त्यांवर ११२७, वागळेमध्ये ५ रस्त्यांवर ३८३ अशी एकूण १७७ रस्त्यांवर दुचाकी, तीनचाकी, चारचाकी अशी तब्बल ९ हजार ८५५ वाहने पार्क केली जाणार आहेत. या पार्किंगच्या ठिकाणी ३९० पार्किंग मार्शल, ३४ पार्किंग सुपरवायझर नेमण्यात येणार आहेत.

Web Title: Free parking is available on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.