Join us

घारापुरी लेण्यांमध्ये विद्युतीकरणाचा मार्ग मोकळा

By admin | Published: January 24, 2017 6:06 AM

जागतिक वारसा लाभलेल्या घारापुरी लेणी आणि परिसराला वीजपुरवठा करण्यासाठी आवश्यक ‘सीआरझेड’ची मंजुरी तत्त्वत: मिळाली आहे.

मुंबई : जागतिक वारसा लाभलेल्या घारापुरी लेणी आणि परिसराला वीजपुरवठा करण्यासाठी आवश्यक ‘सीआरझेड’ची मंजुरी तत्त्वत: मिळाली आहे. त्यामुळे घारापुरी लेण्यांमध्ये वीजपुरवठा करण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून; याबाबतचा लेखी आदेश लवकरच काढण्यात येणार आहे. या परवानगीबरोबरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठीचे सर्व अडथळे महावितरणने पार केले आहेत.‘सीआरझेड’च्या परवानगीबाबतची शेवटची सुनावणी १८ जानेवारी रोजी झाली. या सुनावणीत पर्यावरण विभागाकडून याबाबतचा निर्णय घेण्यात आला. हे काम तत्काळ होण्याकरिता महावितरणकडून सल्लागाराची विशेष नेमणूक करण्यात आली होती. मरिन केबलचा हा पहिला प्रयोग राज्यात केला जाणार आहे. घारापुरीला वीजपुरवठा करण्यासाठी ७ किलोमीटर लांब २२ केव्हीच्या ४ मरिन केबल्स टाकण्यात येणार आहेत. कन्याकुमारी व गुजरात येथे मरिन केबलचे प्रयोग झाले आहेत. किनाऱ्यानजीक सागरी लाटांचा वेग, खडकाळ भाग यांचा सामना करत सुमारे २५ मीटर खोल मरिन केबल टाकण्याचे काम आव्हानात्मक आहे. मरिन केबलमुळे अखंड वीजपुरवठा करणे शक्य होणार असून, त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल. हा प्रकल्प सुरू करण्याआधी महावितरणाला मेरिटाइम बोर्ड, जेएनपीटी, सिडको, भारतीय नौदल, रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, एसईझेड, आर्किओलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया, पर्यावरण व वन विभागाच्या परवानग्या मिळवाव्या लागल्या आहेत. (प्रतिनिधी)