कोळीवाडे, गावठाणांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 05:22 AM2018-05-01T05:22:16+5:302018-05-01T05:22:16+5:30
मुंबईचे मूळ रहिवासी असणाऱ्या कोळीवाडे आणि गावठाणे तसेच आदिवासी पाडे व मुंबई विमानतळाच्या फनेल झोनसाठी (विमानाचे टेक आॅफ व लँडिंगसाठी) मुंबईच्या नवीन विकास आराखड्यात स्वतंत्र विकास नियंत्रण
मुंबई : मुंबईचे मूळ रहिवासी असणाऱ्या कोळीवाडे आणि गावठाणे तसेच आदिवासी पाडे व मुंबई विमानतळाच्या फनेल झोनसाठी (विमानाचे टेक आॅफ व लँडिंगसाठी) मुंबईच्या नवीन विकास आराखड्यात स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली करण्यात येणार आहे. त्यामुळे लाखो मुंबईकरांना न्याय मिळाला असून गेली अनेक वर्षे विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या या मुंबईकरांच्या पुनर्विकासाचा मार्ग खुला झाला आहे.
मुंबईत सुमारे ८८ गावठाणे व ४१ कोळीवाडे असून तत्कालीन सरकारने १४ जानेवारी २००३ रोजी त्यांच्या पुनर्विकासासाठी १९९१ च्या विकास नियंत्रण नियमावलीत योग्य बदल सुचविण्यासाठी एक अभ्यास गट स्थापन केला होता. या अभ्यास गटाने डिसेंबर २००३ साली आपला अहवाल सादर केला. त्यानुसार महापालिकेने प्रस्ताव मंजूर करून फेब्रुवारी २००५ साली शासनाकडे पाठवला. मात्र, तत्कालीन सरकारने त्याला स्थगिती दिली होती. त्यानंतर या कोळीवाडे आणि गावठाणांच्या विकासाची दारे जवळजवळ बंद होऊन त्यांच्या विकासाचा खोळंबा झाला. त्यांना आपल्या राहत्या घराची दुरुस्ती व डागडुजी करतानाही अडचणी निर्माण झाल्या.
दरम्यानच्या काळात मूळ मुंबईकरांना न्याय मिळावा म्हणून हालचाली सुरू झाल्या. मूळ मुंबईकरांच्या पुनर्विकासासाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली असावी तसेच त्यांना अतिरिक्त एफएसआय देण्यात यावा, कोळीवाडे आणि गावठाणांचे सीमांकन करण्यात यावे, अशा मागण्या मांडण्यात आल्या. यावर आता कुठे सीमांकन करण्याच्या कामाला सुरुवात झाली असून नव्या विकास आराखड्याची घोषणा नगरविकास विभाग आणि महापालिकेने करताना कोळीवाडे, गावठाणे व आदिवासी पाड्यांसाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यात येईल, असे जाहीर केले.
या निर्णयामुळे या रहिवाशांच्या पुनर्विकासाचा मार्ग खुला होणार आहे, अशी माहिती वॉचडॉग फाऊंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा यांनी दिली.