झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा
By admin | Published: April 12, 2015 01:44 AM2015-04-12T01:44:59+5:302015-04-12T01:44:59+5:30
वर्तक नगर प्रभाग समितीमधील सन २००२ पासून रखडलेला झोपडपट्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे : वर्तक नगर प्रभाग समितीमधील सन २००२ पासून रखडलेला झोपडपट्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रिपाइं एकतावादीने काढलेल्या मोर्चाची दखल घेऊन आयुक्तांनी या समस्येसाठी निवडलेल्या संयुक्त समितीची पालिकेच्या मुख्यालयात गुरुवारी पहिलीच बैठक घेतली. त्यामध्ये या झोपडपट्यांचा पुनर्वसन समितीने हिरवा कंदील दिला.
बीएसयूपी, राजीव गांधी आवास योजनेतून हे पुनर्वसन होणार होते. एवढेच नाही तर वाल्मिकी आवास योजने अंतर्गत पालिकेने १२४० पात्र लाभार्थ्यांपैकी २७० लाभार्थ्यांचे पुनर्वसन केले होते. त्यानंतर याच झोपडीधारकांना २०१० मध्ये बीएसयूपी योजनेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
२०११ मध्ये पुन्हा त्यांच्या पुनर्वसनाचा ठराव पालिकेने मंजूर केला होता. मात्र, काहींनी झोपडीधारकांच्या पुनर्वसनला खीळ घालण्याचे काम केले. त्यामुळे त्रस्त झालेल्या झोपडीधारकांनी रिपाइं एकतावादीचे जितेंद्रकुमार इंदिसे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन ठामपावर धडक मोर्चा काढला. त्यानंतर पालिका आयुक्त संजय जयस्वाल यांनी येथील झोपडपट्यांच्या पुनर्वसनाकरीता संयुक्त समिती स्थापना करण्याची घोषणा केली. (प्रतिनिधी)