एक वर्षाखालील बालकांना महापालिकेमार्फत पीसीव्ही लस मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:06 AM2021-07-08T04:06:49+5:302021-07-08T04:06:49+5:30
मुंबई : महापालिकेचे आरोग्य केंद्र, दवाखाने व रुग्णालयांमध्ये वैद्यकीय औषधोपचारांसह लसीकरण देखील नियमित करण्यात येते. या अंतर्गत आता एक ...
मुंबई : महापालिकेचे आरोग्य केंद्र, दवाखाने व रुग्णालयांमध्ये वैद्यकीय औषधोपचारांसह लसीकरण देखील नियमित करण्यात येते. या अंतर्गत आता एक वर्षाखालील बालकांना न्यूमोनिया आणि इतर न्यूमोकोकल आजारांपासून संरक्षण देणारी ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन’ मोफत देण्यात येणार आहे. मुंबईत दीड लाखांपेक्षा अधिक बालक एक वर्षाखालील आहेत.
या लसीकरणाच्या पूर्वतयारीसाठी सध्या संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच जनजागृती करण्यात येत असून लस, सिरींजेस व इतर सामुग्रीच्या वितरणाची व्यवस्था करण्यात येत आहे. यानंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार बालकांचे प्रत्यक्ष लसीकरण सुरू करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.
यासाठी केले जाणार लसीकरण....
स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया या जीवाणूमुळे न्यूमोकोकल हा संसर्गजन्य आजार होतो. हा आजार म्हणजे फुप्फुसांना होणारा एकप्रकारचा संसर्ग आहे. या आजारामुळे बालकांना श्वास घ्यायला त्रास होतो, धाप लागते, ताप येतो व खोकलाही येतो. तसेच जर हा संसर्ग गंभीर स्वरूपाचा असल्यास मेंदुज्वर, न्यूमोनिया सेप्टिसिमिया अशा कारणांमुळे मृत्यूदेखील ओढवू शकतो.
* सध्या बीसीजी, पोलिओ, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हेपेटाइटिस-बी, एच इन्फ्लुएंझा-बी, रोटा वायरस, गोवर, रुबेला या आजारांवर प्रतिबंधक लस देण्यात येते.
* नियमित लसीकरण कार्यक्रमात ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन’ या नवीन लसीचा अंतर्भाव करण्यात येणार आहे.
* पालिकेतील आरोग्य केंद्रे, प्रमुख व उपनगरीय रुग्णालय तसेच शासकीय रुग्णालयामध्येही ही लस मोफत देण्यात येणार आहे.
* पीसीव्ही लस तीन डोसमध्ये दिली जाणार आहे. दोन प्राथमिक डोस वयाच्या सहा आठवड्यांत, १४ आठवड्यांत आणि एक बूस्टर डोस वयाच्या नवव्या महिन्यांत देण्यात येईल.