Join us

इंटरनेट पूर्ववत करण्यासाठी ‘फ्री काश्मीर’चे पोस्टर - मेहक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 5:52 AM

गेटवे ऑफ इंडियाजवळच्या आंदोलनात फ्री काश्मीरचे पोस्टर आणि ते पोस्टर धरून उभी राहणारी मुलगी राज्यातच नव्हे, तर देशात चर्चेचा विषय ठरली आहे.

मुंबई : गेटवे ऑफ इंडियाजवळच्या आंदोलनात फ्री काश्मीरचे पोस्टर आणि ते पोस्टर धरून उभी राहणारी मुलगी राज्यातच नव्हे, तर देशात चर्चेचा विषय ठरली आहे. या मुलीचे नाव मेहक मिर्झा प्रभू असून ती काश्मिरी वगैरे नव्हे, तर मराठी आहे. मुंबईत जन्मलेल्या आणि वाढलेल्या मेहकने फ्री काश्मीरचे पोस्टर सोमवारी गेटवेवर झालेल्या निदर्शनात दाखविले व त्यावरून राजकारणाचा वादंग सुरू झाला. या पार्श्वभूमीवर तिने ते पोस्टर का दाखविले यावर आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले.मेहक प्रभू हिने आपल्या व्हिडीओमध्ये सांगितले की, मंगळवार, ६ जानेवारीला लोकशाहीवर विश्वास असणाऱ्यांनी आंदोलन केले. मीही त्यात सहभागी झाले. त्या ठिकाणी एक फलक पडलेला होता. त्यावर ‘फ्री काश्मीर’ लिहिलेले होते. मी तो उचलला. कारण काश्मीरमध्ये इंटरनेट आणि मोबाइल सेवा सुरू करावी, असे मला या माध्यमातून सांगायचे होते. कारण तो तेथील लोकांचा मूलभूत स्वायत्त अधिकार आहे. आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला जगण्याचे स्वातंत्र्य हवे. काश्मीरमध्ये जे निर्बंध लादले गेले आहेत ते हटविले पाहिजेत. त्यासाठी फलक हातात घेतल्याचे तिने म्हटले आहे. सोबतच मी काश्मिरी नाही, मी मुंबईची मराठी मुलगी आहे. मी सामान्य भारतीयांप्रमाणे लोकशाही अधिकारासाठी आवाज उठवत होते, असे मेहकने फेसबुक पोस्टमधून सांगितले आहे.