Join us

मोफत तांदूळ वितरणाला १० एप्रिल नंतर प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 5:41 PM

मुंबई ठाण्यातील ८७ लाख लाभार्थ्यांना होणार लाभ

खलील गिरकर

मुंबई : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मुंबई व ठाण्यातील 87 लाख पात्र लाभार्थ्यांना विनामूल्य तांदूळ दिले जाणार आहेत. सध्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना दर महिन्याप्रमाणे दोन रुपये प्रति किलो दराने तीन किलो गहू व तीन रुपये प्रति किलो दराने दोन किलो तांदूळ वाटप सुरु आहे. आजपर्यंत सुमारे 47 टक्के जणांना म्हणजे सुमारे 41 लाख जणांना वाटप करण्यात आले असून उर्वरीत जणांना 10 एप्रिल पर्यंत धान्य वाटप करण्यात येईल व त्यानंतर विनामूल्य तांदूळ वाटप करण्यात येईल. 

 

मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्हा व ठाणे जिल्ह्यातील  महापालिका क्षेत्रातील (वसई विरार महापालिका वगळून) ज्यांचे वार्षिक उत्पन्न 59 हजार पर्यंत आहे असे 87 लाख जण राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये पात्र आहेत. त्यामध्ये अंत्योदय गटातील एक लाख जणांचा समावेश आहे. या 87 लाख जणांना या योजनेचा लाभ मिळेल. अशा प्रकारे विविध ठिकाणी पात्र असलेल्यांना विभागातर्फे तांदूळ वाटप केले जाईल. 

 

सध्या मुंबई, ठाणे विभागात दर महिन्याला देण्यात येणाऱ्या गहू व तांदळाचे वितरण केले जात आहे. ते झाल्यानंतर विनामूल्य तांदूळ वाटपाला प्रारंभ होईल. जे नागरिक राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट असतील केेवळ त्यांनाच पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रति माणसी ५ किलो तांदूळ विनामूल्य देण्यात येणार आहेत. 

 

मुंबई रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष नवीन मारु यांनी सांगितले, मजूरांची कमतरता असल्याने एफसीआयकडून रेशन दुकानदारांपर्यंत धान्य येण्यास काहीसा विलंब होत असला तरी 10 ते 15 एप्रिल पर्यंत सर्व दुकानांमध्ये धान्य पोचेल व आम्ही त्याचे वितरण करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लॉकडाऊनच्या काळात दुकानदारांना घरापासून दुकानापर्यंत जाण्या येण्यासाठी अत्यावश्यक सेवेचे पास उपलब्ध करुन दिल्या बाबत त्यांनी विभागाचे आभार व्यक्त केले. रेशन दुकानात गर्दी टाळण्यासाठी दररोज कमाल 50 जणांना टोकन द्यावे जेणेकरुन दुकानदारांना जास्त त्रास होणार नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

 

मुंबईतील काही ठिकाणी रेशन दुकाने वेळेवर उघडली जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांमधून करण्यात येत आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. 

------------------------------------------

केंद्र सरकारच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत मुंबई व ठाणे परिसरातील 87 लाख व्यक्तींना प्रत्येकी पाच किलो तांदूळ विनामूल्य देण्यात येणार आहे. यासाठीची तयारी पूर्ण होत आली आहे. सध्या आम्ही नियमित धान्य वाटप करत असून 10 पर्यंत हे काम झाल्यावर विनामूल्य तांदूळ वाटपाला प्रारंभ करणार आहोत. रेशन दुकानदारांनी सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत दुकान सुरु ठेवणे बंधनकारक आहे. 

कैलाश पगारे, नियंत्रक, मुंबई व ठाणे शिधावाटप विभाग व संचालक अन्न व नागरी पुरवठा 

टॅग्स :अन्नमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस