लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई-गोरेगाव पूर्व आरे येथील वणीचा पाडा व खडकपाडा या दोन आदिवासी पाड्यांमध्ये आरोग्याची गुढी उभारत महिलांना २२५ मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप केले. गुढीपाडवा व नूतन वर्षाचे औचित्य साधून अभिषेक शैक्षणिक व सामाजिक संस्था व युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही आरोग्याची गुढी उभारली.
अभिषेक शैक्षणिक सामाजिक संस्था ही मुलांच्या शिक्षणासाठी व महिलांच्या आरोग्यासाठी लोकपयोगी काम करत असून या संस्थेने मार्च महिन्यात अनेक महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप केल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्ष सुनीता नागरे यांनी दिली.
यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना सुनीता नागरे म्हणाल्या की, महिलांचा महत्वाचा विषय म्हणजे मासिक पाळी,मात्र आजही आदिवासी महिला मासिक पाळीत कपडा किंवा गोणपाट, राख अशा गोष्टी वापरतांना दिसतात.कापड चा वापर सोडून महिलांनी सॅनिटरी पॅड चा वापर करावा आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी स्वतःचे संरक्षण करावे असे आवाहन त्यांनी केले.
तसेच जी आदिवासी मुले शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असून अनेक मुलांना शालेय साहित्य त्याचप्रमाणे ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य ही संस्था करत आहे. तसेच महिलांसाठी दरमहा मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येत असून महिलांना काही गंभीर आजार किंवा शस्त्रक्रिया करण्यास अडचणी येत असतील तर त्याचा खर्च सुद्धा संस्था उचलत असल्याची माहिती त्यांनी दिली.
या उपक्रमाला युवा फाउंडेशनचे अध्यक्ष सोहम सावळकर,डॉ. महेश अभ्यंकर, दिलीप साहू अशा अनेक मान्यवरांचे योगदान लाभले.यावेळी वनिता सुतार, सुरज विश्वकर्मा व ऋतुजा नागरे व इतर मान्यवर उपस्थित होते.