लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने ‘मिटवू डिजिटल दरी’ या उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थ्यांना स्व-अध्ययन मोबाइल अॅपची एका वर्षाची मोफत सदस्यता देण्यात येणार आहे. कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. अनेक वंचित व गरजू विद्यार्थ्यांचे योग्य साधने व मार्गदर्शनाअभावी मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झाले आहे. यावर्षीही विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकावे लागणार आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता त्यांना स्व-अध्ययन मोबाइल अॅप देण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने तेथील विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रम मेमरी कार्डवर दिला जाईल. यासोबतच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वह्यासुद्धा देण्यात येणार आहेत. अॅप व वह्यांचे हे ई-स्कूल किट खालीलप्रमाणे दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. यापैकी कोणताही एक पर्याय किंवा दोन्ही पर्याय निवडून एक किंवा अधिक विद्यार्थ्यांना मदत केली जाऊ शकते. अधिकाधिक दात्यांनी या उपक्रमास मदत करून शिक्षणाच्या वाटेतील डिजिटल दरी मिटविण्यास हातभार लावावा, असे आवाहनही सेवा सहयोगच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छुक दात्यांना ९१६७४४८२८५ या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठवून देणगी लिंक मिळविता येईल.
देणगी पर्याय १ : स्व-अध्ययन मोबाइल अॅप (ऑनलाइन) १२ वह्या, १ चित्रकला वही = ५०० रुपये प्रतिविद्यार्थी
देणगी पर्याय २: स्व-अध्ययन मोबाइल अॅप (ऑफलाइन) १२ वह्या १ चित्रकला वही = १ हजार रुपये प्रतिविद्यार्थी
.......................................................................