Join us

बेस्टच्या सेवेतून बीड विभागातील एसटी कर्मचाऱ्यांना मुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 4:05 AM

माजी मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना विनंतीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीड जिल्ह्यातील एसटी ...

माजी मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीड जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी जास्त सेवा दिली. बेस्टच्या सेवेतून बीड विभागातील एसटी कर्मचाऱ्यांना मुक्त करा, अशी विनंती माजी मंत्री बदामराव पंडित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली.

कोरोनाचा संसर्ग होईल, या भीतीने मुंबईतील बेस्टचे कर्मचारी प्रवासी वाहतुकीच्या कर्तव्यावर येण्यास तयार नाहीत. मुंबईत कर्तव्य बजावून परतल्यानंतर कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. पंडित यांनी सांगितले की, कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने, राज्यातील विविध जिल्ह्यांत लॉकडाऊन करण्यात आला आहे. मुंबईत बेस्टच्या सेवेत राज्यातील विविध जिल्ह्यांतून चालक-वाहकांना नियुक्त करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी सहा महिने सेवा केली आहे. विशेषता इतर जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी केवळ तीन महिने सेवा केली आहे. हा बीडमधील एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे. बीड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी अधिक सेवा केली आहे, त्यांना या सेवेतून मुक्त केले जावे आणि इतर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना नियुक्त करावे, असेही त्यांनी सांगितले.

* मुंबईत आल्यावर कोरोना होत नाही का?

मराठवाड्यातील काही जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन करण्यात आले आहे. संसर्ग वाढू नये, म्हणून एसटीच्या फेऱ्याही मोठ्या प्रमाणात बंद करण्यात आल्या आहेत, पण तेथील एसटीचे चालक, वाहक व इतर कर्मचारी मात्र मुंबईत बेस्टच्या वाहतुकीसाठी बोलविण्यात येतात, हे विसंगत असून, मुंबईत आल्यावर कोरोना होत नाही का, हा अजब प्रकार आहे. ज्या जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण जास्त आहे, त्या जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत बेस्ट कामगिरीसाठी बोलाविण्यात येऊ नये.

- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस