Join us  

राज्याला २०२०पर्यंत व्यसनमुक्त करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 2:51 AM

राज्याच्या स्थापनेला २०२० साली ६० वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्ताने संपूर्ण राज्य व्यसनमुक्त करण्याची मागणी व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाने केली आहे.

मुंबई : राज्याच्या स्थापनेला २०२० साली ६० वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्ताने संपूर्ण राज्य व्यसनमुक्त करण्याची मागणी व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाने केली आहे. या मागणीसाठी मंचाच्या माध्यमातून राज्यातील व्यसनमुक्ती आणि बंदीसाठी प्रचार व प्रसाराचे काम करणाºया एकूण ९९ संस्था व संघटना एकाच व्यासपीठावर मंगळवारी जमल्या होत्या. आझाद मैदानात पार पडलेल्या राज्यव्यापी धरणे आंदोलनावेळी संस्थांच्या मंचाने ही मागणी केली.मंचाच्या निमंत्रक वर्षा विद्या विलास यांनी सांगितले की, राज्य शासनाने ७ जून रोजी काढलेल्या परिपत्रकामुळे मद्यपींचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिपत्रकानुसार महामार्गावरील दारूच्या दुकानांना स्थलांतर करताना पोलीस अहवाल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ना हरकत प्रमाणपत्राची गरज नसेल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामुळे बंद होऊ घातलेल्या दारूच्या दुकानांना सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारच प्रोत्साहन देत असल्याची धारणा लोकांमध्ये झाली आहे. त्यामुळे हे परिपत्रक तत्काळ रद्द करण्याची मागणी मंचाने केली आहे. संबंधित परिपत्रक रद्द करताना राज्याला व्यसनमुक्त करण्याचा निर्धारही धरणे आंदोलनात करण्यात आला. या आंदोलनात व्यसनमुक्ती, व्यसनबंदी यांसाठी काम करणाºया संस्था, संघटना, केंद्र यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यापुढे मंचाच्या माध्यमातून सर्व प्रतिनिधी प्रत्येक जिल्ह्यात एकत्रितपणे काम करणार असल्याचे मंचाने स्पष्ट केले.