मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त वरळी नाका-लोअर परळ शेअर टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने बुधवारी प्रवाशांसाठी दिवसभर मोफत सेवा देण्यात आली. शेअर टॅक्सी संघटनेला १७ वर्षे पूर्ण झाली. दरम्यान, संघटनेतर्फे रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून ४० ते ४५ युनिट रक्त संकलन करण्यात आले.
वरळी नाका - लोअर परळ शेअर टॅक्सी चालक-मालक संघटनेचे सदस्य राजेश कदम यांनी सांगितले की, बुधवारी दिवसभरामध्ये ८० टॅक्सी वरळी नाका ते लोअर परळपर्यंत धावल्या. या वेळी सकाळी ४० आणि सायंकाळी ४० गाड्यांनी मोफत वाहतूक सुविधा पुरविली. वाहतूककोंडीवर पर्याय देण्यासाठी व वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्यासाठी संघटनेतर्फे वरळी नाका येथे चार स्वयंसेवक, सिरामिल चौक चार स्वयंसेवक, यादवराव चौक दोन व लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळ चार स्वयंसेवक उभे राहून वाहतूक कोंडी सोडवतात.
प्रत्येक दिवशी १५ गाड्यांना साप्ताहिक सुट्टी असून हे चालक-मालक वाहतूककोंडी सोडविण्यासाठी हातभार लावतात. याशिवाय प्रवासी विसरून गेलेले सामान त्यांना सुपुर्द करण्यात या संघटनेचा प्रथम क्रमांक आहे. अडचणीच्या वेळी प्रवाशांना मोफत सेवाही पुरविली जाते. ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ हा या संघटनेचा या वर्षीचा संकल्प आहे, अशी माहिती वरळी नाका - लोअर परळ शेअर टॅक्सी चालक-मालक संघटनेचे सचिव सुबोध मोरे यांनी दिली.