सार्वजनिक वाहतुकीला फुकट्यांचा विळखा, बेस्टचे बुडाले १३२ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 11:55 PM2019-11-12T23:55:40+5:302019-11-12T23:55:44+5:30
प्रवासी संख्या वाढण्यासाठी बेस्ट उपक्रमाने जुलै, २०१९ पासून बसभाड्यात मोठी कपात केली,
मुंबई : प्रवासी संख्या वाढण्यासाठी बेस्ट उपक्रमाने जुलै, २०१९ पासून बसभाड्यात मोठी कपात केली, परंतु गेल्या वर्षभरात फुकट्या प्रवाशांमुळे बेस्टचे तब्बल १३२ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या तोट्यासाठी नादुरुस्त ई-तिकीट यंत्र जबाबदार असल्याची नाराजी बेस्ट समिती सदस्यांनी व्यक्त केली आहे. बेस्ट अधिकाऱ्यांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे.
बेस्ट उपक्रमाने ७ जुलै, २०१९ पासून बसभाडे किमान पाच रुपये ते कमाल २० रुपये केले. त्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत तब्बल दहा लाखांनी वाढ झाली आहे. भाडेकपातीमुळे उत्पन्नात घट होत असल्याने आर्थिक तोटा वाढतच आहे. याबाबत चिंता व्यक्त करताना बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी, २०१८-१९ या कालावधीत बेस्ट उपक्रमाला विनातिकीट प्रवास करणाºया प्रवाशांमुळे १३२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे बेस्टच्या अहवालावरून निदर्शनास आणले.
ई-तिकीट यंत्रणेतील बिघाडामुळे बºयाच प्रवाशांना तिकीट देता येत नव्हते, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. शिवसेनेचे सदस्य सुहास सामंत यांनी यास दुजोरा दिला. मात्र, बेस्ट अधिकाऱ्यांनी बचावात्मक पवित्रा घेत, काही वर्षांपूर्वी दररोज ४२ लाख प्रवाशी बेस्ट बसगाड्यांमधून प्रवास करीत होते. यामध्ये घट होऊन ही संख्या २५ लाखांपर्यंत घसरली होती. या काळात तिकीट विक्रीही कमी झाल्यामुळे हा फरक असल्याचा बचाव अधिकारी करीत आहेत.
>२००५ पूर्वी बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून ४२ लाख प्रवासी दररोज प्रवास करीत होते. शेअर रिक्षा-टॅक्सी आल्यानंतर बेस्टच्या प्रवासी संख्येत मोठी घट होऊन १७ लाख प्रवाशीच प्रवास करू लागले. भाडेकपात केल्यानंतर बेस्टची प्रवासी संख्या आता दररोज २८ लाख ६० हजारांवर पोहोचली आहे. मात्र, भाडेकपातीमुळे दररोज ४५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. पूर्वी प्रवासी कमी असले, तरी दररोज सरासरी दोन कोटी ३० लाख रुपये उत्पन्न बेस्टच्या तिजोरीत जमा होत होते. भाडेकपात केल्यानंतर आता दररोज एक कोटी ८० लाख रुपये उत्पन्न जमा होत आहे.
वीज दरामध्येही कपात झाल्यामुळे उत्पन्नात सात कोटी रुपयांची घट झाली, तर जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न तीन कोटी रुपयांनी तर बेस्टच्या मालमत्तेवरील भाडेकरारातून मिळणाºया उत्पन्नात वार्षिक पाच कोटींची वाढ झाली आहे.