मुंबई : मुंबईत अतिशय दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या परिसरात बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांच्या माध्यमातून मुंबईकरांना उत्तमोत्तम सुविधा महापालिकेद्वारे देण्यात येत आहे. नागरिकांना त्यांच्या घराजवळ अतिशय चांगली आरोग्यसेवा सुविधा या योजनेमुळे मिळत आहे.
आपला दवाखान्यामध्ये मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार यासह रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. विशेष तज्ज्ञांच्या सेवादेखील पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. सद्य परिस्थितीतील विविध १९४ ठिकाणी आपला दवाखाने असून, २८ ठिकाणी पॉलिक्लिनिक, तर १६६ ठिकाणी दवाखाने कार्यरत आहेत.
१६ ऑक्टोबर २०२३ पर्यंत :
आपला दवाखान्यांची संख्या १९४ पर्यंत पोहोचली. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत १३ पैकी ६ दवाखाने सुरू झाले. नव्या संख्येमुळे आपला दवाखान्यांच्या संख्येने २००चा आकडा पार केला आहे. आतापर्यंत २३ लाख नागरिकांना आपला दवाखान्याच्या माध्यमातून आरोग्याच्या विविध सुविधांचा लाभ घेतला आहे. पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक केंद्रे येथे साठ हजारांहून अधिक रुग्णांनी दंत चिकित्सा, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोग तज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ अशा विविध तज्ज्ञांच्या उपचार सुविधेचा लाभ घेतला आहे.
प्रारंभी १ लाख लाभार्थी संख्या ३० नोव्हेंबर २०२२ रोजी पूर्ण झाली होती. ७ जानेवारी २०२३ रोजी २ लाख. ३ फेब्रुवारी २०२३ रोजी ३ लाख. २२ फेब्रुवारी २०२३ रोजी ४ लाख. ६ मार्च २०२३ रोजी ५ लाख याप्रमाणे लाभार्थी टप्पा गाठला गेला. १ एप्रिल २०२३ रोजी संख्या ६ लाखांवर २२ एप्रिल २०२३ पर्यंत आणखी एक लाख लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला.
तपासणी, समुपदेशन व पाठपुरावाही :
महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे महापालिका दवाखान्यांमध्ये मानसिक आरोग्य तपासणी, सल्ला व उपचार पुरवण्यात येत आहेत. दवाखान्यांमध्ये एप्रिल २०२३ पासून मानसिक आरोग्य उपचारांचा २ हजार ४७१ जणांनी लाभ घेतला आहे. महानगरपालिकेच्या वतीने मानसिक आरोग्याशी संबंधित रुग्णांची तपासणी, समुपदेशन व पाठपुरावाही करण्यात येत आहे.
१ हजार ४०० रुग्णांचे समुपदेशन :
महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे ७ एप्रिल २०२३ पासून १९० दवाखाने व १३५ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांमध्ये मिळून ४६२ वैद्यकीय अधिकारी यांना मानसिक आरोग्यासंबंधी प्रशिक्षण देण्यात आले आहे.
एप्रिलपासून नवीन २ हजार ४७१ संशयित मानसिक रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यापैकी ३४७ सौम्य आणि ४१ गंभीर स्वरूपाचे रुग्ण आढळले. एकूण २११ रुग्णांना पुढील उपचाराकरिता महानगरपालिका रुग्णालयांमध्ये संदर्भित केले गेले. तर १ हजार ४०० रुग्णांचे समुपदेशन व पाठपुरावा करण्यात आला.