मुंबईच्या रुग्णालयात मोफत उपचार, धर्मादाय आयुक्तांचा पुढाकार, गरीब रुग्णांना नवे जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 11:46 PM2017-11-25T23:46:24+5:302017-11-25T23:47:05+5:30
राज्यभरात ४३० धर्मादाय रूग्णालये असून, त्यापैकी मुंबईतील ७६ नामांकित व सुसज्ज रूग्णालयांमध्येही गरजू रूग्णांना मोफत उपचार मिळणे शक्य झाले आहे.
लातूर : राज्यभरात ४३० धर्मादाय रूग्णालये असून, त्यापैकी मुंबईतील ७६ नामांकित व सुसज्ज रूग्णालयांमध्येही गरजू रूग्णांना मोफत उपचार मिळणे शक्य झाले आहे. राज्य धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या निर्देशामुळे व राखीव खाटांच्या तरतुदीमुळे ग्रामीण रूग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत.
कळंब तालुक्यातील देवधानोरा येथील ज्योतीराम आडसूळ हे मजूरी करतात़ त्यांच्या ४ वर्षे ६ महिने वयाच्या प्रबुद्ध या मुलास हृदयाचा त्रास होता़ दोन वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया झाली़ परंतु, पुन्हा त्रास सुरू झाला़ डॉक्टरांनी उपचाराचा खर्च पावणे तीन लाख रूपये सांगितला होता़ त्यांनी मुंबई येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयात राज्य आयुक्त न्या़ शिवकुमार डिगे यांची भेट घेतली़ त्यांना सार्वजनिक न्यास नोंदणीकृत रूग्णालयांची माहिती देण्यात आली़ तातडीने आयुक्त कार्यालयातून कोकिळाबेन रूग्णालयाशी संपर्क साधण्यात आला व १५ दिवस मोफत उपचारही मिळाले़
रुग्णालये गरिबांच्या दारी
मुंबईमध्ये ७६ धर्मादाय रुग्णालयांनी ‘धर्मादाय रुग्णालये आपल्या दारी’ ही मोहीम ४ नोव्हेंबरला राबविली़ आता ३ डिसेंबरला राज्यातील सर्वच धर्मादाय रूग्णालये ही मोहीम राबविणार आहेत़ मुंबईमध्ये हिंदूजा, कोकिळाबेन, जसलोक, बॉम्बे हॉस्पिटल, लिलावती, ब्रीच कॅन्डी यासारख्या नामांकित रूग्णालयांनी गरीब रूग्णांची रस्त्यावर, दारात येऊन तपासणी केली़
कागदपत्रे कोणती लागतात़़़?
आधारकार्ड, पॅनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड ही कागदपत्रे लागतात़ ५० हजारांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना मोफत उपचार मिळतात़ ५० हजार ते १ लाखांपर्यंत उत्पन्न असणाºयांना ५० टक्के सवलत देणे बंधनकारक आहे़