पूजा दामले, मुंबईमौखिक आरोग्य चांगले राहावे, गोरगरीब जनतेला मुखाच्या कर्करोगासह अन्य मौखिक उपचार मोफत घेता यावेत, या उद्देशाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत मौखिक आजारांवरील उपचारांचा समावेश लवकरच करण्यात येणार आहे. शहरी आणि ग्रामीण परिसरात मौखिक आरोग्याविषयी अजूनही म्हणावी तितकी जनजागृती झालेली नाही. शहरी भागात दातांचे आजार, तर ग्रामीण भागात हिरड्यांचे आजार होण्याचे प्रमाण अधिक आहे. दातांचे अथवा हिरड्यांचे आजार हे जिवास घातक नसल्यामुळे अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात. त्याचबरोबर तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण राज्यात अधिक दिसून येते. मात्र, मुखाच्या कर्करोगावरील उपचार घेणे सर्वांनाच आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. अशांना दिलासा मिळावा म्हणून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत या उपचारांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मानसिंग पवार यांनी दिली. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत सध्या ९७१ आजारांवर मोफत उपचार होतात. या आजारांच्या यादीत पुढच्या काहीच महिन्यांत वाढ करण्यात येणार आहे. सध्या त्याची प्रक्रिया सुरू आहे. मुखाचा कर्करोग या यादीत समावेश करण्यात येणार आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी एक बैठक झाली. त्यात फक्त मुखाचा कर्करोगच नाही, तर अन्य मौखिक शस्त्रक्रिया आणि उपचारांचा समावेश करावा, असे मत तज्ज्ञांनी मांडले. त्यामुळे यापुढे दात, हिरड्यांच्या आजारावर उपचार घेणे जनतेला सहज शक्य होणार आहे.
मौखिक आजारांवर मोफत उपचार
By admin | Published: March 21, 2016 2:59 AM