पालिका रुग्णालयात १८ वर्षांपर्यंतच्या रुग्णांवर होणार मोफत उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 06:52 AM2018-12-18T06:52:03+5:302018-12-18T06:52:44+5:30
१३ कोटींच्या निधीची तरतूद : सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती
मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे १८ वर्षांपर्यंतच्या रुग्णांवर शहर-उपनगरातील पालिका रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येणार आहेत. नुकताच या विषयीचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करण्यात आला आहे. या करिता १३ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
स्थायी समितीत मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत नवजात बालकांच्या जन्माच्या वेळी येणाऱ्या समस्या, अपंगत्वाचे उशिरा होणारे निदान याशिवाय विविध आरोग्यविषयक उपचार व शस्त्रक्रियांचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत ३० वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या व आजारांवर उपचार केले जातील. जेणेकरून, या माध्यमातून बालकांच्या आरोग्यविषयक समस्यांचे लवकर निदान होण्याचे प्रमाण वाढेल.
प्रस्तावानुसार, ३ लाख ८५ लाख ९७६ रुग्णांवर उपचार करण्याचे उद्दिष्ट आहे. याविषयी, पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संयुक्त कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले की, मुला-मुलींमधील आरोग्यविषयक समस्यांचे निदान लवकर व्हावे, याकरिता हा प्रस्ताव विचाराधीन होता. त्याला नुकतीच स्थायी समितीने मान्यता दिली असून, लवकरच याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
प्रस्तावाची अंमलबजावणी लवकरच
पालिका रुग्णालयांत १८ वर्षांपर्यंतच्या रुग्णांना आतापर्यंत अत्यल्प शुल्क आकारून त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते, परंतु भविष्यात उपचारांकरिता कोणतेही शुल्क न आकारता त्यांच्यावर मोफत उपचार केले जातील. या संदर्भातील प्रस्तावाची अंमलबजावणी लवकरच केली जाईल, असे पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संयुक्त कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले.