ज्येष्ठ नागरिकांना पालिका रुग्णालयांत मिळणार मोफत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 04:14 AM2018-07-03T04:14:38+5:302018-07-03T04:14:46+5:30
महापालिकेच्या रुग्णालयात आता ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या प्रस्तावाला सार्वजनिक आरोग्य समितीने नुकतीच मंजूरी दिली.
मुंबई : महापालिकेच्या रुग्णालयात आता ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या प्रस्तावाला सार्वजनिक आरोग्य समितीने नुकतीच मंजूरी दिली. स्थायी समितीच्या अंतिम मंजुरीनंतर याचा लाभ वृद्धांना मिळणार आहे.
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार मिळावेत, अशी मागणी गेली अनेक वर्षे नगरसेवकांकडून होत आहे. अखेर ही मागणी मान्य करीत ज्येष्ठ नागरिकांवरील उपचार विनामूल्य करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी पालिकेच्या केईएम, शीव व नायर रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष खाटांचा वॉर्ड तयार केला जाणार आहे.
अनेकवेळा वृद्धापकाळात मुले आई-वडिलांना बघत नाहीत. उतारवयात प्रकृतीच्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना तक्रारी जाणवू लागतात. अशावेळी पैसे नसल्याने ते उपचार करून घेत नाहीत किंवा सुरू असलेले उपचार अर्धवट सोडतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना पालिका रुग्णालयात मोफत उपचार उपलब्ध झाल्यास त्यांना आधार मिळेल, या उद्देशाने त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
विशेष खाटांचा वॉर्ड
पालिकेच्या केईएम, शीव व नायर रुग्णालयात वृद्धांसाठी विशेष खाटांचा वॉर्ड तयार केला जाणार आहे.
वृद्धांच्या तपासणीसाठी रुग्णालयात स्वतंत्र कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात येणार आहे.
स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग, लॅब व फिजिओथेरपी युनिटचीही व्यवस्था केली जाणार आहे.