Join us

ZP शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश द्या, बच्चू कडूंची 'गोड' सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 4:26 PM

शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक विधानभवन येथे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई : शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये समन्वय साधून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर आणि देशपातळीवर स्वत:च्या क्षमतांना न्याय देता आला पाहिजे. शिक्षण विभागामध्ये सुसूत्रता आणत त्याची पुनर्रचना करणे आवश्यक आहे, असे शालेय शिक्षण राज्यमंत्रीबच्चू कडू यांनी सांगितले. तसेच, जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात यावे, अशा सूचना बच्चू कडूंनी दिल्या आहेत.

शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक विधानभवन येथे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती वंदना कृष्णा, तसेच संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करुन इतर उपक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. तसेच शिक्षकांची अ-ब-क अशी वर्गवारी करुन त्याचे परीक्षण वेळोवेळी झाले पाहिजे. शालेय स्तरावर जातिनिहाय होणारे गणवेश वाटप बंद करुन जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेशांचे मोफत वाटप करण्यात यावे. यासाठी केंद्र शासनाचा निधी कमी पडत असेल तर राज्याचा निधी वापरण्याच्या सूचना राज्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

तसेच विद्यार्थ्यांचा विकास महत्त्वाचा असून ज्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असेल तर त्या संबंधित शिक्षकांवर कारवाई झाली पाहिजे, असेही कडू यांनी सांगितले. शालेय पोषण आहार, शिष्यवृत्ती, निविदा प्रक्रिया, शाळेसाठी क्रीडांगणे, शाळेच्या इमारती, खासगी शाळांचे प्रवेश शुल्क, दिव्यांग शाळांची निर्मिती या विषयांवरही बैठकीमध्ये सविस्तर आढावा घेण्यात आला.  

टॅग्स :बच्चू कडूशिक्षणमंत्रीजिल्हा परिषद शाळा