चित्रपट उद्योगातील १३०० कर्मचाऱ्यांना मोफत लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:06 AM2021-07-21T04:06:13+5:302021-07-21T04:06:13+5:30
मुंबई : फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (एफडब्ल्यूआयसीई) या संघटनेतील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचे मोफत लसीकरण करण्यात येत ...
मुंबई : फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (एफडब्ल्यूआयसीई) या संघटनेतील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचे मोफत लसीकरण करण्यात येत आहे. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत एकूण १३०० जणांना लस देण्यात आली. यामध्ये कलावंत, स्पॉटबॉइज, लाइटमेन, सेटिंग वर्कर्स, ज्युनियर आर्टिस्ट, मेकअप आर्टिस्ट, स्टण्टमेन, बॅकग्राउंड डान्सर्स आदींचा समावेश आहे.
पीव्हीआरने मुंबईतील चित्रपट उद्योगातील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत लसीकरण मोहीम नानावटी मॅक्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या सहयोगाने सुरू केली आहे. याबाबत पीव्हीआर लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय बिजली म्हणाले, सरकार राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेसाठी करत असलेल्या प्रयत्नांचे आम्ही प्रशंसक आहोत आणि चित्रपट उद्योगातील कामगारांचे लसीकरण करून आम्ही आमचा वाटा उचलत आहोत. चित्रपट उद्योगाला व चित्रपटसृष्टीला पूर्वपदावर आणण्यासाठी लसीकरण हीच गुरुकिल्ली आहे. यात आम्ही सर्व जण एकत्र आहोत आणि आम्हाला चित्रपट उद्योगातील कामगारांच्या प्राणांचे रक्षण करणारे दूत म्हणून काम करण्याची इच्छा आहे. एफडब्ल्यूआयसीईमधील रोजंदारी कामगारांसाठी मोफत लसीकरण मोहिमेचा विस्तार करणे हे या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.