मुंबई : वाढदिवसानिमित्ताने कुठे पार्टी रंगते तर कुठे मोठ मोठे समारंभ. अशात कोरोनाच्या संकटात भांडुपच्या राजोल संजय पाटील या तरुणीने मात्र अनोख्या पद्धतीने आईचा वाढदिवस साजरा केला. यावेळी १,८०० नागरिकांचे मोफत लसीकरण करत वाढदिवस साजरा करत आईला भेट दिली. सध्या तिच्या या अनोख्या भेटीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कायद्याचे शिक्षण घेत असलेली राजोल सांगते, गेल्या अनेक दिवसांपासून लसीकरण बंद आहे. त्यात लसीकरण केंद्रावर असलेल्या गर्दीमुळे नागरिकांचे हाल होत होताना दिसत होते. आईकडूनही याबाबत खंत व्यक्त होत होती. त्यात आईच्या वाढदिवशी काय गिफ्ट घेऊ, ज्याने ती आनंदी होईल या विचारात मोफत लसीकरण मोहीम राबविण्याचे ठरवले. यात तरुणांपासून ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग सर्वानी उपस्थित राहून आईला आशीर्वाद दिला. त्यामुळे याहून मोठे गिफ्ट दुसरे नसते मिळाल्याचे ती सांगते.
राजोलने स्व. दिना बामा पाटील प्रतिष्ठान व तारादेवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भांडुपमध्ये राबविलेल्या या मोहिमेत भांडुपच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांनी हजेरी लावली. यावेळी १,८०० जणांचे मोफत लसीकरण पार पडले. तसेच ४०० हून अधिक जणांना आई पल्लवी पाटील यांच्या हस्ते छत्री वाटपदेखील करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून राजोलच्या मोहिमेत उपस्थित राहून तिला प्रोत्साहन दिले.
फोटो आहे - राजोल पाटील
फोटो ओळ : कोरोनाच्या संकटात भांडुपच्या राजोल पाटील या तरुणीने १,८०० नागरिकांचे मोफत लसीकरण करत वाढदिवस साजरा करत आईला भेट अनोखी दिली.