आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : १८ ते ४५ वयोगटांतील सर्व नागरिकांना राज्य सरकारने त्यांच्या कोट्यातून मोफत लस देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी भाजप मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यास परवानगी दिली आहे. यातील ५०% लस ही केंद्र सरकारच्या माध्यमातून मोफत दिली जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारनेही त्यांच्या कोट्यातून मोफत लस देण्याची व्यवस्था करावी, असे आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे.
देशातील मध्यप्रदेश, बिहार या राज्यांनी मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित लोकांची संख्या जास्त असल्यामुळे लोकांचा मोठ्या प्रमाणावर रोजगार बुडाला आहे. सद्य:स्थितीतील टाळेबंदी लावण्याच्या आधीसुद्धा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत दोन आठवडे टाळेबंदी लावण्यात आली होती. त्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पहिल्या टाळेबंदीनंतर महाराष्ट्र सरकारने कुठलेही पॅकेज अथवा मदत ही सर्वसामान्य माणसाला केली नव्हती. त्यामुळे आतातरी १८ ते ४५ वयोगटांतील सर्व नागरिकांना राज्य सरकारने आपल्या कोट्यातून मोफत लस द्यावी, अशी आग्रही मागणी भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
....................................................................