बाळ ठणठणीत राहण्यासाठी मोफत लसीकरण केले का? लसींबाबत नागरिकांमध्ये जागरूकता, वेळापत्रक आखून दिले जाते
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 03:57 PM2023-05-17T15:57:56+5:302023-05-17T15:58:19+5:30
विशेष म्हणजे सर्व सरकारी, महापालिका, जिल्हा रुग्णालयात हे लसीकरण मोफत केले जाते.
मुंबई : आपल्याकडे बाळाचा जन्म झाल्यानंतर तत्काळ लसीकरण केले जाते. कारण भविष्यात होणाऱ्या आजारांपासून, जीवघेण्या आजारापासून त्याचे संरक्षण होईल. नागरिकांमध्ये या लसीकरणाबद्दल चांगलीच जागरुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे पालकही बाळ पाच वर्षांचे होईपर्यंत डॉक्टरांनी लसीकरणाचे जे वेळापत्रक आखून दिले आहे, त्याप्रमाणे लसीकरण घेत असतात. ज्या आजाराच्या प्रतिबंधात्मक लस दिल्या जातात, त्यामध्ये पोलिओ, गोवर क्षयरोग, घटसर्प, डांग्या खोकला, कावीळ, इन्फ्लुएन्झा बी आणि धनुर्वात या आजारांचा समावेश आहे. त्यामुळे बाळाची प्रकृती ठणठणीत राहण्याकरिता लसीकरण करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे सर्व सरकारी, महापालिका, जिल्हा रुग्णालयात हे लसीकरण मोफत
केले जाते.
या लसीकरणामुळे बाळाच्या शरीरात रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होते. संपूर्ण देशात लसीकरणासंदर्भात राष्ट्रीय कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे लहान बाळाचे आरोग्य चांगले राहते. त्याशिवाय बालमृत्युदरात मोठ्या प्रमाणात घट आली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात या लसी मोफत मिळतात. प्रत्येक बाळाच्या आईवडिलांना पाच वर्षात कोणती लस कोणत्या वयात दिली गेली पाहिजे, याचे वेळापत्रक व माहिती असलेले कार्ड देण्यात येते.
मुंबईत महापालिकेच्या सर्व रुग्णालयात ही लस मोफत दिली जाते. पालकांनी आपल्या बाळासाठी ही लस वेळच्या वेळी घ्यावी म्हणून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. शहरात २४ प्रभाग असून प्रत्येक प्रभागात वैद्यकीय अधिकरी असतात, ते या लसीकरणाच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवून असतात.
त्यामुळे काही दिवसांपूर्वी गोवरची साथ मुंबईत काही प्रभागात आली होती. त्यावेळी तत्काळ संबंधित प्रभागातील अधिकाऱ्यांनी त्या प्रभागात गोवरलसीचे अतिरिक्त सत्र आयोजित करून ही साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता.
बाळाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यात वेळच्या वेळी लसीकरण मोठी भूमिका बजावत असते. अनेक आजारांना लसीकरणामुळे प्रतिबंध करणे सहज शक्य आहे. पूर्वीच्या काळी लस घेण्यासाठी विरोध व्हायचा, मात्र नागरिकांना आता लसीचे महत्त्व पटले आहे. त्यामुळे बहुतांश पालक त्यांना दिलेल्या वेळापत्रकानुसार स्वतःहून लस घेण्यासाठी पुढे येतात. या लसीचे महत्त्व डॉक्टरांसोबत आरोग्य कर्मचारी सांगत असतात. सर्व रुग्णालयात लसीकरणाचा कार्यक्रम व्यवस्थित राबविला जातो.
- डॉ. पल्लवी सापळे, बालरोग तज्ज्ञ आणि अधिष्ठाता सर जे. जे. रुग्णालय