मुंबई : अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक मिळत नसल्याने गेली अनेक वर्षे रखडलेल्या ३५ हजार जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे़ विकास नियोजन आराखड्यातून या इमारतींना प्रोत्साहनपर एफएसआय मंजूर करण्यात आला आहे़ त्यामुळे धोकादायक स्थितीत असतानाही जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या अशा इमारतींमधील लाखो रहिवाशांना दिलासा मिळणार आहे़सन २०१४ ते २०३४ या २० वर्षांकरिता मुंबईच्या विकासाचे नियोजन केले जात आहे़ त्यामुळे या जुन्या इमारतींच्या विकासाचा गेली अनेक वर्षे रखडलेला प्रश्नही या आराखड्यातून सोडविण्यात आला आहे़ त्यानुसार जुन्या इमारतींच्या पुनर्विकासातून विकासाकाला ४० टक्के अतिरिक्त प्रोत्साहनपर एफएसआय देण्याची शिफारस करण्यात आली आहे़ यामुळे जुन्या इमारतींच्या विकासासाठी बिल्डर पुढे येतील, असा पालिकेला विश्वास वाटतो आहे़दक्षिण मुंबईत काळबादेवी, भायखळा, गिरगाव अशा विभागांमध्ये जुन्या इमारतींचे प्रमाण सर्वाधिक आहे़ मात्र विकासक पुढे येत नसल्याने येथील अनेक इमारतींचा पुनर्विकास रेंगाळला आहे़ परिणामी अनेक इमारती धोकादायक स्थितीत आहेत़ तर काही इमारती कोसळल्याने जीवित व वित्तहानी झाल्याचीही नोंद आहे़ मात्र विकास आराखड्यातील नव्या तरतुदींमुळे जुन्या इमारतींमधील रहिवाशांना मोकळा श्वास घेता येणार आहे़ (प्रतिनिधी)
३५ हजार जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
By admin | Published: May 14, 2016 1:24 AM