Join us

शाळा, महाविद्यालयांना परीक्षेसंदर्भातील स्वातंत्र्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 4:06 AM

राज्य मंडळ : परीक्षेसंदर्भातील विद्यार्थ्यांसाठी सूचना जाहीरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिक्षणमंत्र्यांनी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण ...

राज्य मंडळ : परीक्षेसंदर्भातील विद्यार्थ्यांसाठी सूचना जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शिक्षणमंत्र्यांनी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या दहावी व बारावीच्या बोर्डाच्या ऑफलाईन परीक्षांसंदर्भातील सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार राज्य मंडळाकडूनही प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनाचे अधिकार शाळा आणि महाविद्यालयांना देण्यात आले आहेत, असे राज्य मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी सांगितले.

दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा २१ एप्रिल ते १० मे तर बारावीच्या २२ एप्रिल ते १० मे दरम्यन आयोजित करण्यात आल्या आहेत. दहावीच्या तोंडी, श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा घेण्याचे स्वातंत्र्य शाळांना देण्यात आले आहे, तर बारावीच्या कला, वाणिज्य व व्यावसायिक शाखांतील विषयांची श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा घेण्याचे स्वातंत्र्य संबंधित महाविद्यालयांना देण्यात आले आहे. दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यशिक्षण, शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र विषयांच्या लेखी, प्रत्यक्षिक परीक्षा २१ एप्रिल ते १ मे दरम्यान होणार आहे.

बारावीचा विद्यार्थी भविष्यात विविध कौशल्याधारित उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणार असल्याने व सध्या कोविड १९ ची परिस्थिती लक्षात घेता प्रात्यक्षिकांची संख्या मंडळाने कमी केली आहे. या परीक्षासाठी अंतर्गत व बहिस्थ परीक्षक संबंधित कनिष्ठ महाविद्यालयातून देण्यात येतील, असे मंडळाने म्हटले आहे.

या आहेत सूचना

या कालावधीत शाळांमध्ये पिण्याचे पाणी, सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली असली तरी विद्यार्थ्यांनी स्वतःची पाण्याची बाटली व सॅनिटायझरही आणावे, असे मंडळाने सूचित केले आहे. स्वतःचा मास्क, पेन आणि इतर लेखन साहित्य या दरम्यान अनिवार्य असणार आहे.

सोबतच विद्यार्थ्यांचा तणाव कमी करण्याच्या दृष्टीने विद्यार्थी पालक यांना वारंवार येणाऱ्या शंकांची उत्तरे राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहेत. त्याचा वापर विद्यार्थी पालकांनी करावा, असे आवाहनही राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.