'अभिव्यक्ती स्वातंत्र्य पूर्ण कधीच नव्हते'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 04:50 AM2019-09-23T04:50:24+5:302019-09-23T04:50:27+5:30
मेघना पेठे यांचा दावा : पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा
मुंबई : भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आलबेल आहे, असे नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न सार्वकालिक आहे. इतिहासाच्या कोणत्याच कालखंडात पूर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्य कधीच नव्हते, असे सांगत, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा एकाकी द्यावा लागतो, हे अत्यंत दुख:द आहे, असे मत प्रसिद्ध कथाकार मेघना पेठे यांनी व्यक्त केले.
मुंबई मराठी पत्रकार संघातील आयोजित कार्यक्रमात वर्ष २०१९चे पदश्री दया पवार स्मृती पुरस्कार शुक्रवारी प्रदान झाले. त्यावेळी पेठे बोलत होत्या. कवयित्री मलिका अमर शेख, शाहीर शीतल साठे, कथाकार मेघना पेठे यांना त्यांच्या आजपर्यंतच्या लेखनाबद्दल पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले. रोख ११ हजार, शाल आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाचे पुरस्काराचे २२वे वर्ष आहे. हिंदी साहित्यिक ओमप्रकाश वाल्मिकी यांच्या ‘झुठन’ आत्मकथनाच्या ‘उष्ट’ या मराठी अनुवादासाठी मंगेश बनसोड यांना ‘बलुतं पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ग्रंथाली चळवळीच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. बलुतं पुरस्काराचे दुसरे वर्ष आहे. रोख ११ हजार, पुरस्कार आणि गोधडी असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
याप्रसंगी पेठे म्हणाल्या, देशात अस्मितांचे तण माजले आहे. त्यामुळे दुखरेपणा वाढला असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जास्त घाला पडतो आहे. बलुतंमधील दु:ख केवळ दलित्वाचं नाही. ते अखिल मानव जातीचे आहे. म्हणूनच माझ्यासारख्या निम्न मध्यवर्गीय दलित नसलेल्या व्यक्तीस बलुतं भावले, असे सांगत दलित साहित्यातले शब्द पुढच्या पिढ्यांना समजण्याची सोय का नसावी, असा मुद्दा त्यांनी मांडला. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिराबाई दया पवार यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. व्यासपीठावर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी, समीक्षक डॉ. हरिश्चंद्र थोरात आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे होते. भारतात सरकारांना आता पुस्तकाची भीती वाटू लागली आहे. याचा अर्थ समाजाची अधोगती चालू आहे, असे ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी म्हणाल्या. ‘दलित’ शब्दावर बंदी घालून आज दलित साहित्य व चळवळीचा वारसा पुसून टाकला जातो आहे. अशा काळात दलित चळवळीशी जोडून घेण्याचा प्रतिष्ठानचा प्रयत्न असल्याचे प्रतिष्ठानच्या संयोजक व कवयित्री प्रज्ञा दया पवार म्हणाल्या.
आता परिस्थिती ठीक नाही
मराठीत बलुतं जितके महत्त्वाचे आहे, तितके झुठन हिंदीत आहे, असे सांगून मैला वाहणारे व गटार साफ करणाऱ्यांची वेदना इतरांपर्यंत पोहोचावी, अशी झूठनच्या अनुवादामागची भूमिका होती, असे मंगेश बनसोड म्हणाले. देशात आज कलाकार व अल्पसंख्यांक यांच्यासाठी परिस्थिती ठीक नाही. भारतातले खरे राजकारण सांस्कृतिक असून ते कलाकार चालवितात, पण त्यांना स्थान मात्र दिले जात नाही, असा मुद्दा शाहीर शीतल साठे यांनी मांडला.