Join us

विकासापेक्षा स्वातंत्र्य मोठे, ब्रिटीशांना पळवले नसते तर...; उद्धव ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 4:40 PM

ब्रिटीशही देशाचा विकास करत होते, परंतु हुकुमशाही होती. आम्हाला विकासापेक्षा स्वातंत्र्य हवे. कुठल्याही हुकुमशाहाला भारतमातेच्या पायात बेड्या घालायला देणार नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

मुंबई – आमची विचारधारा वेगळी असली तरी संविधानाचे रक्षण करणे हा एकमेव उद्दिष्ट आहे. स्वातंत्र्याची लढाई झाली होती. ‘चले जाव’ची सुरुवात मुंबईतूनच झाली होती. का आणि कोणासाठी? ब्रिटीशही विकास करत होते, जर त्यांना आपण पळवले नसते, पूर्ण ताकद रस्त्यावर उतरली नसती तर ब्रिटीशही विकास करतच होते. आम्हाला विकास हवाय, पण त्याचसोबत स्वातंत्र्यही हवे. विकासापेक्षा स्वातंत्र्य मोठे आहे. त्याचे रक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र आलोय असं विधान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, देशात रक्षाबंधन होत आहे परंतु महिलांना सुरक्षित वातावरण देशात, राज्यात नाही. त्यामुळे महिलांना सुरक्षित वाटावं असं सरकार आम्हाला आणायचे आहे. आम्ही भारत मातेचे रक्षण करण्यासाठी एकत्र आलोय. हुकुमशाही, जुमलेबाजीविरोधात एकत्र आलोय. ‘इंडिया’ जसजसं पुढे जाईल तसे सरकार सिलेंडर फ्री देईल. ९ वर्ष सरकारला बहिण आठवली नाही. इंडिया आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला होत आहे. महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय केंद्र आणि राज्य सरकार कुठे आहे? संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही लढत आहोत. ब्रिटीशही देशाचा विकास करत होते, परंतु हुकुमशाही होती. आम्हाला विकासापेक्षा स्वातंत्र्य हवे. कुठल्याही हुकुमशाहाला भारतमातेच्या पायात बेड्या घालायला देणार नाही. मुंबईतूनच ब्रिटीशांना चले जावचा नारा दिला होता. हा देश आमचे कुटुंब आहे. म्हणून आम्ही एकत्र आलोय असं त्यांनी म्हटलं.

मुंबई वेगळी करण्याचा डाव हाणून पाडू

महाविकास आघाडीचे सरकार का पाडले हे लोकांच्या लक्षात आले असेल. मुंबई वेगळे करणे किंवा केंद्रशासित करणे हा डाव उघड झाला आहे. ज्याक्षणी आमचे सरकार केंद्रात आणि राज्यात येईल तेव्हा आम्ही यांचे डाव हाणून पाडू. दिल्लीसाठी वटहुकूम आणला तेव्हाच भाजपाचा डाव ओळखला होता. केंद्राचा हस्तक्षेप राज्यात वाढत चालला आहे. आमचे सरकार आल्यानंतर त्यांचे निर्णय उलटे फिरवल्याशिवाय राहणार नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

तसेच शिवसेना-प्रकाश आंबेडकर यांची युती जानेवारीत जाहीर केलीय. आम्ही एकमेकांपासून वेगळे होण्यासाठी आलो नाही. जर प्रकाश आंबेडकरांची तयारी असेल ते मविआ आणि इंडियात येऊ शकतात. त्यांच्याशी अद्याप चर्चा झाली नाही. ४ राज्यांसोबत लोकसभा निवडणूक घेताय, त्याचसोबत महापालिका निवडणुकाही घ्या, सर्व परिणाम निकालात नक्की दिसतील असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

अद्याप जागावाटपावर चर्चा नाही - पवार

आम्ही जागावाटपाची चर्चा अजून सुरू केली नाही. इथून पुढचा आमचा सामुहिक कार्यक्रम काय असावा याबाबत मुंबईच्या बैठकीत चर्चा होईल. त्यानंतर काही लोकांवर जबाबदारी टाकली जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असं शरद पवार यांनी म्हटलं. मायावती यांनी काहीवेळा भाजपाशी सुसंवाद केलेला आहे. त्यामुळे त्या कोणासोबत जातील याबाबत आता स्पष्टता नाही.  त्याचसोबत आघाडीत वेगवेगळे पक्ष आहेत हे खरे आहे. मात्र कमान समान कार्यक्रम ठरवून आम्ही पुढे जातोय असंही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधानांचे भाषण ऐकले, त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराची टीका केली, त्यात सिंचन घोटाळा, बँकेतील गैरव्यवहार याचा उल्लेख केला. जिथे सत्तेचा गैरवापर झाला अशी माहिती पंतप्रधानांकडे असेल तर त्यांनी चौकशी करा आणि देशासमोर वस्तूस्थिती ठेवा असं आवाहन शरद पवार यांनी पंतप्रधानांना केले. तसेच आमच्याबाबत काही संभ्रम नाही, त्या लोकांना लोकं जागा दाखवतील असं सांगत पवारांनी अजित पवार गटाला टोला लगावला.

टॅग्स :उद्धव ठाकरेभाजपाइंडिया आघाडीशरद पवार