जेएनपीटी बंदराची मालहाताळणी क्षमता वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:06 AM2021-09-21T04:06:46+5:302021-09-21T04:06:46+5:30

मुंबई : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अर्थात जेएनपीटी बंदराची मालहाताळणी क्षमता आता वाढणार आहे. या बंदरातून ड्वार्फ कंटेनर सेवा ...

The freight capacity of JNPT port will be increased | जेएनपीटी बंदराची मालहाताळणी क्षमता वाढणार

जेएनपीटी बंदराची मालहाताळणी क्षमता वाढणार

Next

मुंबई : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अर्थात जेएनपीटी बंदराची मालहाताळणी क्षमता आता वाढणार आहे. या बंदरातून ड्वार्फ कंटेनर सेवा सुरू करण्यात आली असून, केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सोमवारी त्यास हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर ड्वार्फ कंटेनर आयसीडी कानपूरला रवाना झाला.

नेहमीच्या कंटेनरपेक्षा ड्वार्फ कंटेनरची उंची ६६० मिलीमीटरने कमी आहे. कमी उंचीमुळे ग्रामीण, अर्ध-नागरी आणि शहरी रस्त्यावरून मर्यादित उंचीचे सब वे, लेव्हल क्रॉसिंगवरूनही ट्रेलर सहज जाऊ शकतात. शिवाय हे कमी उंचीचे कंटेनर एकावर एक असे दुमजली असतात. त्यामुळे माल वाहून नेण्याची क्षमता ६७ टक्क्यांनी वाढते. ड्वार्फ कंटेनर ७१ टन वजन वाहून नेऊ शकतात, तर आयएसओ मानांकन असलेल्या नेहमीचे कंटेनरची क्षमता ४० टन इतकी असते.

भारतीय रेल्वेने दुमजली आयएसओ कंटेनर रेल्वेच्या तुलनेत मालवाहतूक खर्चावर १७ टक्के सवलत दिल्याने एकूण सवलतीचे प्रमाण ३३ टक्के इतके झाले आहे. कमी उंचीच्या कंटेनरद्वारे मालाची वाहतूक केल्याने वाहतूक खर्च कमी होण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात आले. ड्वार्फ कंटेनर रेल्वेसेवा ही रेल्वे वाहतूक सुटसुटीत करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे सोनोवाल यांनी सांगितले. यामुळे आयात-निर्यातदार समुदायाला देशाच्या अंतरभागातून वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी मदत होणार असून, जेएनपीटी बंदरात रेल्वे मालवाहतूक वाढणार आहे. हे कंटेनर बंदरांसाठी अनुकूल असून, किफायतशीर किमतीच्या दृष्टिकोनातून त्यांचे उत्पादन भारतात करता येऊ शकते. यामुळे मेक इन इंडिया अभियानासाठी संधी खुल्या होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

.....

कंटेनर तुटवड्यावर मात्रा

- जेएनपीटी कंटेनर टर्मिनलमध्ये कमी उंचीच्या कंटेनरकरिता डेपो उभारण्यासाठी ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. तेथून नेहमीच्या आयएसओ कंटेनरमधून माल कमी उंचीच्या कंटेनरमध्ये हलवण्यात येईल. यामुळे बंदरात निर्यातीसाठी आवश्यक असणाऱ्या आयएसओ कंटेनरची उपलब्धता राहील.

- सध्या निर्यातीसाठी आयएसओ कंटेनरचा तुटवडा भासत आहे. या पावलामुळे कंटेनरचा प्रतीक्षा कालावधी महिन्यावरून काही दिवसापर्यंत कमी होईल.

- माल कमी उंचीच्या कंटेनरमध्ये हलवला जाईल आणि रिकामे आयएसओ कंटेनर जवळच्या कारखान्यातील निर्यातक्षम मालासाठी सहज उपलब्ध होतील.

Web Title: The freight capacity of JNPT port will be increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.