मुंबई : २०१७ ते २०२० या चार वर्षात अतिवृष्टीच्या घटनांमध्ये स्थिर पण सातत्याने वाढ होताना दिसत असून, मुंबईतील अतिवृष्टीची वारंवारिता ही विशेषत: गेल्या चार वर्षात वाढत आहे. भौगोलिकदृष्ट्या पाहता अतिवृष्टीच्या सर्वाधिक घटना वरळी-दादर, कुर्ला आणि अंधेरी या पश्चिम आणि मध्य मुंबईत झालेल्या दिसतात, असे डब्ल्यूआरआय इंडिया रॉस सेंटर ऑफ सस्टेनेबल सिटीजच्या सहयोगी संचालक लुबैना रंगवाला यांनी नमूद केले.
मुंबई महापालिका, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया यांच्या सहकार्याने मुंबईचा पहिला वातावरण कृती आराखडा २०२१ च्या अखेरीस तयार होत असून, शुक्रवारी मुंबई वातावरण कृती आराखड्याच्या संकेतस्थळाचे उद्घाटन केले गेले. यावेळी लुबैना रंगवाला बोलत होत्या.
मुंबई महानगरपालिकेच्या ३७ स्वयंचलित हवामान केंद्राच्या नोंदीनुसार गेल्या दहा वर्षात सरासरी पातळीवर सहा मुसळधार, पाच अति मुसळधार आणि चार अतिवृष्टीचे दिवस प्रत्येक वर्षात दिसून येतात. तसेच दरवर्षी मान्सूनमधील मुंबईच्या पावसाचे प्रमाण हे अंदाजे १० टक्के मुसळधार, नऊ टक्के अति मुसळधार आणि सहा टक्के अतिवृष्टी या प्रकारे दिसून येते. भारतीय हवामान विभागाच्या वर्गवारीनुसार एका दिवसात ६४.५ मिमी ते ११५.५ मिमी पाऊस म्हणजे मुसळधार, ११५.६ ते २०४.४ मिमी पाऊस म्हणजे अति मुसळधार आणि २०४.५ मिमीपेक्षा अधिक पाऊस म्हणजे अतिवृष्टी असे आहे, असे देखील लुबैना रंगवाला यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले, वातावरणीय दृष्ट्या शहरी पूर आणि वाढते तापमान ही दोन महत्त्वाची आव्हाने मुंबई शहरापुढे आहेत. गेल्या पन्नास वर्षातील तापमानाचा कल पाहता, भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार तापमानात स्थिर अशी वाढ दिसून येते. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी तापमानातील अनियमितता, नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे हिवाळी महिने उन्हाळी महिन्यांपेक्षा अधिक वेगाने उष्ण होताना दिसतात.