Join us

खाद्यतेलाचा वारंवार वापर हा तर गुन्हा; होऊ शकतो कॅन्सर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:07 AM

मुंबई : भारतात बाहेरील तळलेले पदार्थ खाण्याचे शौकीन असणारे बरेच आढळून येतात. रस्त्यावर एखाद्या गाड्यावर कढईत एखादा पदार्थ तळताना ...

मुंबई : भारतात बाहेरील तळलेले पदार्थ खाण्याचे शौकीन असणारे बरेच आढळून येतात. रस्त्यावर एखाद्या गाड्यावर कढईत एखादा पदार्थ तळताना दिसला की आपोआप काहींची पावले त्या पदार्थावर ताव मारण्याकरिता गाड्याकडे वळतात. रेस्टॉरंटमध्ये किंवा स्टॉलवर विकण्यात येणारे तळलेले पदार्थ आरोग्यासाठी हानिकारकसुद्धा ठरू शकतात. अनेकदा एकाच तेलात दिवसभर अनेक पदार्थ तळले जातात. वापर केलेल्या तेलाचा पुन्हा वापर करणे हा गुन्हा आहे. असे असतानाही रेस्टॉरंटमध्ये या तेलाचा सर्रास वापर केला जातो. यामुळे असे पदार्थ खाणाऱ्यांना आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात.

तेलाचा पुनर्वापर आरोग्याला घातक

पुनर्वापर केलेल्या तेलामध्ये रॅडिकल्स तयार होऊन ते मानवी शरीरातील रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम करतात. कॅन्सर होण्याचीदेखील शक्यता असते. या तेलामुळे शरीरातील चरबी वाढून हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. पोटाचे विकार व घशाची जळजळ हे आजारदेखील उद्भवतात.

रस्त्यावर न खाल्लेलेच बरे

रस्त्यावर अनेकदा एकाच कढईत दिवसभर वेगवेगळे पदार्थ तळण्यात येतात. सकाळी पुरी, वडे, समोसे, भजी असे पदार्थ तळल्यानंतर दुपारी व संध्याकाळीदेखील तळण्यासाठी पुन्हा हेच तेल वापरण्यात येते. त्याचप्रमाणे इतर भाज्यांच्या फोडणीसाठीदेखील याच तेलाचा वापर केला जातो.

डॉक्टरांचा सल्ला

जेवण बनविताना दररोज तेलाचा वापर करावाच लागतो. तेलाचा वापर केल्याने जेवणाची चव वाढते. भारतीय कुटुंबांमध्ये आठवड्यातून एकदा तरी तेलात तळलेले पदार्थ जेवणात बनतातच. मात्र, अशा वेळी चांगल्या तेलाचा वापर करणे गरजेचे आहे. घरात सतत वापरण्यात येणारे तेल वापरले जात नाही ना याची काळजी घेतली जावी. फक्त बाहेरील पदार्थांसाठीच नाही तर घरातदेखील पुन्हा वापरण्यात येणारे तेल वापरणे योग्य नाही, असे डॉ. मंदार सातोसे यांनी सांगितले.

...तर होईल गुन्हा दाखल

एखाद्या अन्नपदार्थ विक्रेत्याने आपल्या येथे विक्रीसाठी ठेवलेले पदार्थ वारंवार वापरण्यात येणाऱ्या तेलात तळले असल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन कारवाई करते. स्टॉलवर विकण्यात येणारे पदार्थ हे झाकून ठेवलेले असावेत, तेथे स्वच्छतेची काळजी घेतली जावी व खाद्यतेलाचा वारंवार वापर करू नये. तसे आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येते.

स्टार १२१४