व्हॉट्सॲप, स्टेट्स वारंवार पाहणे हादेखील आजार! स्क्रीन टाइम दोन तासांपेक्षा अधिक धोक्याचा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 01:31 PM2023-09-15T13:31:40+5:302023-09-15T13:59:49+5:30
अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या गरजा होत्या आणि आजही आहेत. पण त्यात आता भर पडली आहे ती मोबाइलची.
मुंबई :
अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या गरजा होत्या आणि आजही आहेत. पण त्यात आता भर पडली आहे ती मोबाइलची. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आज प्रत्येकाच्या हातात मोबाइल आला. त्यामुळे आज कुठेही पाहिले तरी प्रत्येकाची मान ही मोबाइलमध्येच शिरलेली असते. खरे तर तुमच्या कामाच्या व्यतिरिक्त दोन तासापेक्षा जास्तवेळ स्क्रीन टाइमवर जात असेल तर तुम्हाला मोबाइलचे व्यसन लागले आहे, असे समजावे असे तज्ज्ञांनी सांगितले. ही धोक्याची घंटा आहे हे ओळखावे, असेही तज्ज्ञांनी नमूद केले आहे. तुम्ही किती वेळ मोबाइलवर होता हे कळते.
आज कुठल्या ना कुठल्या कारणाने प्रत्येकाला मोबाइलची गरज लागते. जेव्हा आपण प्रवास करत असतो, तेव्हा कुणी गाणी ऐकत असतो तर कुणी चित्रपट, वेबसिरीज किंवा सोशल मिडीयावर असतो. रात्री झोपण्यापूर्वी एक तास मोबाइल बाजूला ठेवणे गरजेचे आहे, पण आज झोप लागत नाही म्हणून लोक मोबाइलवर असतात. परिणामी झोप पूर्ण होत नाही त्यातून चिडचिडेपणा, आक्रस्तळेपणा वाढतो. यासाठी तुमचे स्वत:वर नियंत्रण असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला नियंत्रण ठेवता येत नसेल तर आपण मोबाइलच्या आहारी, व्यसन लागले आहे असे समजावे.
सतत मोबाइलवर असणे हे काही चांगले लक्षण नाही. जर आपण खरोखरच मोबाइलच्या आहारी गेलो असू तर मानसोपचार तज्ज्ञ किंवा अनेक हेल्पलाइन आहेत जेथे अशांवर सल्ला दिला जातो. अशा गोष्टींचा त्या व्यक्तीला परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत होते.
- डॉ. सारिका दक्षीकर, मानसोपचार तज्ज्ञ
दिवसातील किती वेळ मोबाइलवर जातो?
२४ तासापैकी अनेकांचा अधिक वेळ हा मोबाइलवरच जातो. काहीही काम नसले तरी लोक मोबाइलवरच असतात. मोबाइल बघण्यातच त्यांचा वेळ जात असल्याने अशांचा आजूबाजूच्या जगाशी काहीही संबंध आहे की नाही अशी शंका येते.
झोप पूर्ण होत नाही. जर तुमची झोप पूर्ण झाली तर तुमच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होतो.
कामासाठी जरूर मोबाइल वापरा. पण काम झाल्यावर तो बाजूला ठेवून कुटुंबासमवेत वेळ घालवा. यातून संवाद वाढतो.
आज मोबाइच्या वापरामुळे संवाद कमी होत चालला आहे. व्हॉटसॲप स्टेट्स पाहायचे आणि त्यातून मग घरात वादाचे प्रसंगही उभे राहतात. कारण कुणीही बाहेर फिरायला गेले की, तिकडचे फोटो स्टेट्समध्ये ठेवतात. यावर एकच उपाय म्हणजे तुमचे नियंत्रण असणे गरजेचे आहे.
मोबाइल वापरताना काय काळजी घ्याल?
मोबाइल वापरताना आपला स्क्रीन टाइम वाढणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. गरज असेल तेव्हाच मोबाइलचा वापर करावा. झोपण्यापूर्वी मोबाइलपासून लांब राहता आले तर ते निश्चितच तब्येतीसाठी चांगले असेल.
आठवड्यातून एक ‘नो मोबाइल डे’
आताच्या काळात एक मिनीटही मोबाइसपासून लांब राहणे अशक्य आहे. पण ज्यांना शक्य आहे, त्यांनी तसे केल्यास नक्कीच चांगले आहे. मुले परदेशी आणि पालक भारतात. अशा परिस्थितीत मोबाइल हाच संवादाचा धागा असतो.
वारंवार मोबाइल पाहणे हा आजार नव्हे, व्यसनच
वारंवार मोबाइल पाहणे हा आजार म्हणण्यापेक्षा ते एक व्यसन आहे असे समजावे. आपण त्याच्या आहारी जात नाही ना हेही पाहायला हवे.
परिस्थितीत यातून मार्ग काढण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
काही वेळेस औषधोपचारही करावे लागतात.अनेकजण रात्री उशिरापर्यंत मोबाइल पाहत असल्याने सकाळी उठायला उशीर होतो.