फ्रीशिपच्या संकेतस्थळाचा गोंधळ सुरू: आॅनलाइनचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 02:23 AM2017-10-09T02:23:22+5:302017-10-09T02:23:34+5:30
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दरवर्षी राज्य सरकारच्या सामाजिक कल्याण विभागातर्फे फ्रीशिप देण्यात येते. फ्रीशिप भरण्यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज करावा लागतो.
मुंबई : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दरवर्षी राज्य सरकारच्या सामाजिक कल्याण विभागातर्फे फ्रीशिप देण्यात येते. फ्रीशिप भरण्यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज करावा लागतो. पण गेल्या काही महिन्यांपासून संकेतस्थळावर सातत्याने गोंधळ सुरू आहे. त्यामुळे फ्रीशिपचा अर्ज भरताना विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. संकेतस्थळाचा गोंधळ असाच सुरू राहिल्यास यंदा फ्रीशिप मिळणार की नाही, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
फ्रीशिपसाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागतो. पण गेल्या काही दिवसांपासून हे संकेतस्थळ हँग होत असल्याची तक्रार विद्यार्थी सातत्याने करतात. पदव्युत्तर शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी फ्रीशिपचे अर्ज करण्यास सांगितले आहे. पण फ्रीशिपच्या संकेतस्थळावर पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा पर्याय नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. सध्या संकेतस्थळ अपडेट करण्याचे काम सुरू असल्याचे विभागातर्फे विद्यार्थ्यांना सांगण्यात येते. पण हे काम कधी पूर्ण होणार याविषयी स्पष्ट कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.
महाविद्यालयांमध्ये फ्रीशिपचे अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली. पण पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही अडचणी येत आहेत. दुसरीकडे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा पर्याय नसल्याने काय करावे, या संभ्रमात विद्यार्थी आहेत. फ्रीशिप अर्जाच्या अंतिम मुदतीविषयी असलेल्या साशंकतेमुळे विद्यार्थ्यांच्या संभ्रमावस्थेत वाढ झाली आहे. काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना सप्टेंबर महिना अखेर असल्याचे सांगितले आहे. तर काही महाविद्यालयांत ५ आॅक्टोबर अशी तारीख देण्यात आली आहे. मात्र अंतिम तारीख नाही़