Join us  

गोड्या पाण्यातील मच्छीमारांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:16 AM

राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाने ३० जून रोजी जाहीर केलेला निर्णय तत्काळ मागे घेण्याची मागणी करत, गोड्या पाण्यातील मच्छीमारांनी बुधवारी आझाद मैदानात निदर्शने केली.

मुंबई : राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाने ३० जून रोजी जाहीर केलेला निर्णय तत्काळ मागे घेण्याची मागणी करत, गोड्या पाण्यातील मच्छीमारांनी बुधवारी आझाद मैदानात निदर्शने केली. शासनाने हा निर्णय मागे घेतला नाही, तर बुधवारपासून महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीतर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.मस्त्य व्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी घेतलेल्या निर्णयामुळे, खारे पाणी आणि गोड्या पाण्यातील मच्छीमार उद्ध्वस्त होऊ लागले आहेत, असा संघर्ष समितीचा आरोप आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या मच्छीमारांनी एकत्र येत, जानकर यांना हटविण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश लोणारे म्हणाले की, ‘जानकर यांनी घेतलेल्या निर्णयामुळे लाखो मच्छीमार बेरोजगार होणार असून, मोठ्या तलावांचे खासगीकरण होणार आहे.’ नव्या निर्णयानुसार तलावांचे ठेके देण्याच्या रकमेत सरकारने तब्बल सहा पटीने वाढ केली आहे. परिणामी, सर्वसाधारण मच्छीमार संस्था यातून बाहेर पडतील, असे संघर्ष समितीकडून स्पष्ट करण्यात आले.