उल्हासनगर - बिघडलेला मोबाइल फोन मित्राकडे दुरुस्तीसाठी देणं कल्याणमधील एका जोडप्याला चांगलचं महाग पडलं आहे. ज्या मित्राकडे हा फोन दुरुस्तीसाठी दिला होता त्याला मोबाइलमध्ये जोडप्याची सेक्स क्लिप सापडली. त्याने आणखी दोघांना ही क्लिप पाठवली व तिघांनी मिळून या जोडप्याचे ब्लॅकमेलिंग सुरु केले. त्यांनी या जोडप्याकडे 20 लाख रुपये आणि महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली.
ब-याच वाटाघाटीनंतर त्यांनी खंडणीची रक्कम 20 लाखावरुन 5 लाख रुपये केली. पण जोडप्याने त्यांच्या दबावासमोर झुकण्यापेक्षा पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर ठाण्याचे खंडणीविरोधी पथक सक्रीय झाले. मोबाइल टॉवरच्या लोकेशनवरुन पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. त्यानंतर अन्य दोघांना खंडणीची पाच लाखाची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी अटक केली.
प्रदीप मोरे (28), ऋषीकेश फुलोरे (22) आणि अविनाश शिंदे (20) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रदीप मोरे मुंबईचा राहणारा आहे तर अन्य दोघे उल्हासनगरला राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित जोडप्याने अविनाश शिंदेकडे त्यांचा मोबाइल दुरुस्तीसाठी दिला होता. अविनाशला त्या मोबाइलमध्ये जोडप्याची सेक्स क्लिप सापडली. त्याने ती क्लिप आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करुन घेतली व फुलोरेला पाठवली. फुलोरेने ती सेक्स क्लिप मोरेला पाठवली. त्यानंतर तिघांनी मिळून जोडप्याच्या ब्लॅकमेलिंगचा कट रचला.
प्रदीर मोरेने रवी कुमार असल्याचे भासवून 20 लाखाची खंडणी मागण्यास सुरुवात केली. त्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. तुझी हत्या करुन ते रोड अपघातात ठार झालीस असे दाखविन अशी धमकी त्याने महिलेला दिली. ठाणे खंडणीविरोधी पथकाने प्रदीप मोरेला त्याच्या मुंबईतल्या घरातून अटक केली. त्यानंतर पोलिसांनी या जोडप्याला अन्य दोघांना फोन करायला लावला व कल्याण येथे पैसे स्वीकारण्यासाठी बोलावले. त्याचवेळी त्यांना कल्याणमधून अटक केली.