मित्रांनो, ST अन् जिल्हा परिषद शाळा वाचवा, सदाभाऊंची भावनिक हाक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 02:41 PM2021-11-23T14:41:41+5:302021-11-23T14:43:52+5:30
अनिल परब रोज तेच शिळं बोलत आहेत. त्यांच्याकडे सांगायला नवीच काहीच नाहीत. त्यांनी येऊन आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांशी बोलावे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली
मुंबई - एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे आणि अन्य काही मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Strike) सुरू आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हजारो कर्मचारी ठाकरे सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. मात्र, सरकारकडून कोणीही या आंदोलकांशी चर्चा करायला आलेले नाहीत. त्यामुळे, संपात सहभागी झालेले भाजपाचे नेते ठाकरे सरकारवर सातत्याने घणाघात करत आहेत. आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे आझाद मैदानात तळ ठोकून बसले आहेत.
अनिल परब रोज तेच शिळं बोलत आहेत. त्यांच्याकडे सांगायला नवीच काहीच नाहीत. त्यांनी येऊन आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांशी बोलावे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली. तसेच आझाद मैदानावर बसलेले हे काय कुठले अतिरेकी आहेत का, असा थेट सवालही त्यांनी केला आहे. तर, सदाभाऊ खोत यांनीही ट्विटवरुन भावनिक आवाहन केलंय.
मित्रानो, एसटी आणि जिल्हा परिषद शाळा वाचवा...
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) November 22, 2021
या दोनच गोष्टींना वाचवा कारण या दोनच गोष्टी गरिबांचा राहिले आहेत.
कोणतीही श्रीमंत व्यक्ती एसटीने प्रवास करत नाही आणि कुठल्याही श्रीमंत व्यक्तीची मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकत नाहीत.
मित्रानो, एसटी आणि जिल्हा परिषद शाळा वाचवा... या दोनच गोष्टींना वाचवा कारण या दोनच गोष्टी गरिबांच्या राहिल्या आहेत. कोणतीही श्रीमंत व्यक्ती एसटीने प्रवास करत नाही आणि कुठल्याही श्रीमंत व्यक्तीची मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकत नाहीत, असे ट्विट सदाभाऊ खोत यांनी केलंय.
शरद पवार, अनिल परब यांच्यात चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांची नेहरू सेंटरमध्ये ४ तास बैठक झाली. मात्र, ठोस निर्णय होऊ शकला नाही. संपावर कसा तोडगा काढता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विलीनीकरणाचा मुद्दा हा उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीसमोर आहे. तिथे राज्य सरकारने काय बाजू मांडावी याबाबतही पवारांसोबत चर्चा झाली. विलीनीकरणाबाबत समितीचा जो अहवाल येईल तो आम्ही स्वीकारू, असे परब यांनी बैठकीनंतर माध्यमांना सांगितले.
पडळकर-खोत आंदोलनात तेल ओततायंत
एसटी पुन्हा सुरू झाली पाहिजे. चर्चेच्या माध्यमातून एसटी कर्मचारी आणि राज्य सरकार यातून नकीच मार्ग काढतील. गोपीचंद पडळकर (gopichand padalkar), सदाभाऊ खोत (sadabhau khot) या आंदोलनात तेल टाकण्याचं काम करत आहेत, असा आरोप राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी केला आहे. यापूर्वी भाजपचं सरकार होतं तेव्हा सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या का मान्य केल्या नाहीत, असाही प्रश्न सत्तार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला आहे.