मुंबई : मित्रांनो, प्रेशर आहे. टेन्शन आहे. काही तरी थ्रिलिंग करायचे म्हणून नशा करणे म्हणजेच आपण आपल्यालाच फसवण्यासारखे आहे. संपविण्यासारखे आहे. म्हणून आपण नशेपासून लांब राहिले पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात नशाबंदी मंडळ व इतर संस्था यांच्या पुढाकाराने आॅनलाइन जागर या कार्यक्रमास सदिच्छा देतो. सामाजिक न्याय विभाग व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी कटिबद्ध आहे याची मी तुम्हाला ग्वाही देतो, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
स्वापक नियंत्रण ब्युरो-भारत सरकार मुंबई शाखा, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबई व आयना ग्रुप, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ आणि वाहतूकविरोधी दिन व सामाजिक न्याय दिनानिमित्ताने फेसबुक लाईव्ह वेबीनारच्या माध्यमातून आॅनलाइन जागर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विविध मान्यवर यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले महाराष्ट्रात व्यसनमुक्त करण्यासाठी सामाजिक संस्थांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. वेबीनारला उगम दान चरण, संचालक स्वापक नियंत्रण ब्युरो-मुंबई यांनी अंमली पदार्थ व त्याचे प्रकार व एन.डी.पी.एस. कायदा या विषयावर सविस्तर माहिती दिली. अन्न व औषधी विभाग यांची भूमिका कृती कार्यक्रम व सामाजिक संस्था यांच्या अपेक्षा याबाबत जुगलकिशोर मंगी, सहायक आयुक्त अन्न व औषधी विभाग, महाराष्ट्र यांनी आपले विचार मांडले. अंमली पदार्थाचे दुष्परिणाम याविषयी डॉ. अजित मगदूम, संचालक अन्वय व्यसन मुक्ती केंद्र, मुंबई यांनी आपली भूमिका विषद केली.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. धरव शाह यांनी समुपदेशनाद्वारे उपचार याची माहिती व्यक्त केली. अंमली पदार्थाचा देशाला विळखा याबाबत अंमली पदार्थाच्या व्यसनाची देशातील आकडेवारी सांगितली. दीपक पाटील, व्यवस्थापक सलाम बॉम्बे फाउंडेशन यांनी ‘तंबाखू से ड्रग्स तक’ या विषयावर व्यसनाचा प्रवास सांगितला. सामाजिक संदेश डॉ. अजादर खान सन फार्मास्युटिकल यांनी माहिती दिली. या वेबीनारचे सूत्रसंचालन नशाबंदी मंडळाचे सचिव अमोल स.भा. मडामे यांनी उत्कृष्टपणे केले. शपथ व आभार मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी मांडले.व्यसनमुक्तीचे संदेश : मंडळाच्या वतीने यावेळी अभिनेते अक्षय कुमार, सोनू सूद, पुलकित सम्राट, अनुराग शर्मा, सिद्धार्थ जाधव व खेळाडू जहीर खान यांनी व्यसनमुक्तीचे संदेश दिले. संगीतकार गंधार जाधव यांच्या मार्गदर्शनाने व त्यांच्या टीमने सुंदर अशा ‘से नो टू ड्रग्ज’ या गीताचे लाँचिंग केले. नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने राज्यभर जिल्हा संघटक यांनी आपापल्या जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेऊन मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थविरोधी जनजागृती केली, अशी माहिती मंडळाचे संघटक प्रतिनिधी बी.एस. सय्यद यांनी दिली.