Join us

कट्ट्याऐवजी सोशल मीडियावर साजरा झाला फ्रेंडशिप डे 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 7:44 PM

मित्र आता फक्त ऑनलाईन दिसत आहेत.

मुंबई : मागील चार महिन्यापासून लॉकडाऊनमुळे मित्रपरिवार दुरावलेला आहे. दररोज एकमेकांना कट्ट्यावर भेटणारे मित्र आता फक्त ऑनलाईन दिसत आहेत. त्यामुळे मित्रांचा कट्टा देखील सुनासुना झाला आहे. दरवर्षी एकमेकांना फ्रेंडशिप डेच्या मिठी मारून शुभेच्छा दिल्या जातात. यावर्षी कोरोनामुळे जीवाभावाच्या मित्रांना भेटता देखील आले नाही. त्यामुळे सोशल मीडियाचा आधार घेत मित्रमैत्रिणीनी व्हिडीओ कॉल, मेसेज करून कट्ट्याऐवजी सोशल मीडियावरच आनंदोत्सव साजरा केला. 

प्रत्येकाचा मित्रांना भेटण्यासाठी एक कट्टा ठरलेला असतो. कोणी कॉलेजच्या मागच्या गेटच्या कट्ट्यावर, चहाच्या टपरीच्या बाकावर, नाक्यावर, कॉफी शॉपच्या बाहेर मित्रपरिवार भेटतात. कोरोनाने संपूर्ण दैनंदिन जीवनचक्र बिघडले आहे. यात मित्रांना भेटून दिवसभराचा तणाव विसरून पुन्हा दुसऱ्या दिवसासाठी तयार होणे, हे बंदच झाले आहे. गप्पा-टप्पा, टिंगलटवाळी सध्या फक्त ऑनलाईनवरच सुरु आहे. 

आयुष्यात इतर नात्यांपेक्षा अनेकदा मैत्री जवळची वाटते. कसलेच बंधन नसलेल्या या नात्याची गोष्टच वेगळी आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी भारतासह अनेक देशांमध्ये फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. त्यामुळे फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने अनेकांनी सोशल मीडियावरच मज्जामस्तीचे व्हिडीओ केले. हे व्हिडीओ स्टेट्सला ठेवण्यात आली होती.  ट्विटर, फेसबुकवर #मैत्रीदिन, #फ्रेंडशिप डे, # फ्रेंडशिप डे २०२० असे हॅशटॅग वापरुन प्रचंड प्रमाणात मेसेज् व्हायरल झाले. आपल्या मित्रांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅप स्टेट्सवर मित्रमैत्रिणीचे फोटो आणि यासोबत चारोळी अपलोड केली होती. तर काहींनी मित्रांचे जुने फोटो कोलाज करून पोस्ट केले होते. तर अनेकांनी कट्ट्यावरील मजेदार जुन्या व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्या. 

 

टॅग्स :फ्रेंडशिप डेतंत्रज्ञानडिजिटल