मुंबई : इन्स्टाग्रामवर अनोळखी तरुणीसोबत संवाद साधणे गोरेगावच्या ग्राफिक डिझायनरला भलतेच महागात पडले आहे. पुढे दोघांमधील अश्लील संवादाचे स्क्रीनशॉट आणि व्हिडीओ पाठवून पैशांची मागणी सुरू केली. यात पैसे देऊनही धमकावणे सरू असल्याने त्याने पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार दिंडोशी पोलीस अधिक तपास करत आहेत.गोरेगाव परिसरात राहणाऱ्या २१ वर्षीय ग्राफिक डिझायनरची यात फसवणूक झाली आहे. त्याचे वडील स्क्रिप्ट रायटर म्हणून काम करत आहेत. त्याच्या तक्रारीनुसार, ३० मे रोजी इन्स्टाग्रामवर एका तरुणीचा संदेश आला. पुढे तिने इन्स्टाग्राम व्हिडीओ कॉलद्वारे बोलू असे सांगताच त्यानेही होकार दिला. त्यावर काही न बोलता एक मुलगी विवस्त्र अवस्थेत दिसली. दोन-तीन सेंकदात व्हिडीओ कॉल बंद झाला. त्यानंतर संबंधिताने अश्लील संवाद साधण्यास सुरुवात केली. नंतर त्यालाही तशाच प्रकारे व्हिडीओ आणि फोटो पाठविण्यास भाग पाडले.पुढे व्हॉट्सअॅप क्रमांक शेअर करत त्यावरून गप्पा रंगल्या. पुढे तरुणाची सर्व माहिती घेतल्यानंतर संबंधित व्हिडीओ आणि संवादाचे स्क्रिनशॉट इन्स्टाग्राममधील मित्रमैत्रिणींना पाठविण्याची धमकी देत २० हजार रुपये पाठविण्यास सांगितले. पुढे पैसे पाठवूनही जुलै महिन्यात पुन्हा धमकीचे संदेश धडकले. यात फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्याने दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दिंडोशी पोलिसांनी गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.
इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 2:05 AM