मुंबई/सातारा - दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे हा देशातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग असणार आहे. विशेष म्हणजे हा जगातील सर्वात लांब महामार्ग असल्याचेही सांगण्यात येते. केंद्रीयमंत्री नितीन गडकरींचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून थेट देशाची राजधानी ते महाराष्ट्राची राजधानी या महामार्गामुळे जोडली जाणार आहे. या महामार्गामुळे रस्ते वाहतूक अधिक गतीमान होणार असून दळणवळण अधिक सोयीचं होणार असल्याचंही दिसून येतं. त्यातच, पुणे ते औरंगाबाद हा प्रवास केवळ २ तासांत उरकला जाणार असल्याचं स्वत: नितीन गडकरी यांनीच सांगितलं.
यंदाच्यावर्षी देशातील ९ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूकांचा बिगुल वाजणार आहे, तर, २०२४ मध्ये म्हणजे केवळ १.५ वर्षात लोकसभा निवडणूकां देखील होत आहेत. त्यामुळे, विकासकामांचा लवकरच निपटारा करुन कामांचे लोकार्पण करण्याकडे मोदी सरकारचे विशेष लक्ष आहे. त्यामुळेच, जानेवारी २०२४ मध्येच राम मंदिराचे लोकार्पण होत असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले. आता, नितीन गडकरी यांनी दिल्ली-मुंबई महामार्गासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.
या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण हे फेब्रुवारी महिन्यात होणार असून सोहना ते दौसा हा टप्पा पूर्ण झाला आहे. 12 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचे लोकार्पण होत आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई यांना जोडणारा हा नेत्रदीपक महामार्ग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या महामार्गामुळे औरंगाबाद ते पुणे हे अंतर केवळ २ तासांत गाठता येणार आहे.
सातारा-सांगली जिल्ह्यातील २३०० कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी नितीन गडकरी यांच्याहस्ते पार पडले. त्यावेळी, त्यांनी मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वेबद्दल माहिती दिली. तसेच, या महामार्गामुळे पुण्याहून केवळ २ तांसात औरंगाबाद गाठता येणार असल्याचेही सांगितले. साताऱ्यात उंडवडी कडेपठार ते फलटण या ३३.६५ किमी लांबीच्या चौपदरीकरणाची पायाभरणी तर, सांगलीत त्यांनी सांगली ते पेठ नाका या ४० किमी लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे भूमीपूजन गडकरींच्या हस्ते पार पडले.